सोलापूर : जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राज्यभर “मिशन मुरघास” ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. उपलब्ध हिरव्या चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने मुरघासामध्ये रूपांतर करून भविष्यातील चारा टंचाईवर मात करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
दुष्काळी परिस्थितीत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास जनावरांच्या आरोग्यावर, दुग्धोत्पादनावर व पशुपालकांच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होतो. सन २०२६-२७ मध्ये खरीप हंगामात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वैरण बियाणे वाटपासाठी ४८.२० कोटी आणि विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पातंर्गत ३ कोटी, असा एकूण ५१.२० कोटी निधी आधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
सध्याच्या टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेतून ६६.४१ कोटी व विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत १० कोटी, असा एकूण ७६.४१ कोटी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून सिंचन सुविधा असलेल्या क्षेत्रावर चारा लागवड करून त्यापासून मुरघास निर्मिती करण्याचे नियोजन आहे.
मोहिमेची वैशिष्ट्ये
पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत तसेच राष्ट्रीय पशुधन अभियान (एनएलएम), (स्मार्ट) योजनेअंतर्गत मुरघास उत्पादक व विक्रेत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने चाऱ्याची कापणी, कुट्टी, दाबणी व हवाबंद साठवणुकीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मका, ज्वारी, नेपिअर यांसारख्या कमी कालावधीत व कमी पाण्यात जादा उत्पादन देणाऱ्या चारा पिकांपासून मुरघास तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.