करमाळा ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने नातेवाईक आणि गोरक्ष दलाच्या नेत्यांची समजूत काढताना  (Pudhari Photo)
सोलापूर

Karmala Crime | अल्पवयीन मुलाच्या मृत्यूप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून ठिय्या : अखेर ७ जणांवर गुन्हा दाखल

साडे येथील घटनेने तणाव

पुढारी वृत्तसेवा

Karmala Sade minor death

करमाळा : साडे (ता. करमाळा) येथील अल्पवयीन १४ वर्षीय मुलाचा मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेऊन मृत्युला कारणीभूत असलेल्या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी नातेवाईकांनी संताप व्यक्त करून ठिय्या आंदोलन केले. ऋषीकेश काशीनाथ लोंढे (वय १४, रा. साडे) असे मृत मुलाचे नाव आहे.

करमाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी मृताच्या नातेवाईक व तसेच गोरक्ष दलाचे नेते यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मृतदेहावर अंत्यसंस्कार करून घ्या, पुढील कारवाई आम्ही करत आहोत, असे सांगितले. मात्र, मृताचे नातेवाईक व गोरक्ष दलाचे नेते यांनी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर पोलिसांनी रात्री उशिरा दिपक लोंढे यांच्या फिर्यादीनुसार ७ संशयित आरोपी विरुद्ध मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

दमदाटी करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मिरताज कुरेशी, सलमान उर्फ मामा शेख, आझाद शेख, शाहरुख कुरेशी, निजाम कुरेशी, मिराज कुरेशी, अफजल कुरेशी (सर्व रा. साडे, ता. करमाळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी फिर्याद दिपक काशीनाथ लोंढे (वय ३६, रा. साडे, ता. करमाळा) यांनी करमाळा पोलिसांत दिली आहे. हा प्रकार सात ऑक्टोबर रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर घडला होता.

याबाबत अशी माहिती की साडे येथील फिर्यादी दिपक लोंढे यांचा भाऊ ऋषीकेश काशीनाथ लोंढे ( वय १४) यास हृदयाचा आजार असल्याने त्यास कोणी दमदाटी केल्यास त्याचा त्याला त्रास होत असल्याचे माहित असतानाही संशयितांनी ७ ऑक्टोबररोजी घरी येऊन दमदाटी केली. ‘दिपकमुळे आमचे खूप नुकसान झाले आहे. ते भरून दे नाही तर रात्रीत तुझे घर पेटून देईन’ अशी धमकी त्यांनी दिली होती. तेव्हा फिर्यादीच्या घरात कोणीही पुरुष नव्हता. त्यामुळे भीतीने गंभीर झालेल्या मुलाला नातेवाईनी दुसऱ्या दिवशी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्यान त्याचा १७ तारखेला मृत्यू झाला. यात दमदाटी केलेने मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृताचा डिस्चार्ज घेऊन रुग्णवाहिकेतून ऋषिकेश याचा मृतदेह थेट सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालय येथून शुक्रवारी (दि.१७ ऑक्टोबर) सायंकाळी करमाळा पोलिस ठाण्यासमोर आणला. यावेळी संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

या घटनेत खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, अशी समजूत पोलिस निरीक्षक माने यांनी नातेवाईक व गोरक्ष दलाचे नेते यांना घातली. मात्र मृताचे नातेवाईक व गोरक्ष दलाचे नेत्यांनी गुन्हा दाखल करण्याचा हट्ट धरला. या परिस्थितीत तणाव वाढू नये, म्हणून पोलिसांनी वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस यांनी सुद्धा करमाळा पोलीस ठाण्यात येऊन याबाबतची अधिक माहिती घेतली व तणाव निवळण्यास प्रयत्न केले. याबाबतचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस करीत आहेत.

एमएलसी नोंद झाल्यानंतर पोलिस रुग्णालयात जबाब घेतात. या घटनेत पोलिसात एमएलसी आली नाही. मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवाल महत्वाचा ठरतो. त्यानुसार कायदेशीर गुन्हा दाखल होईल. करमाळा पोलिसांकडून कधीही कोणावर अन्याय होणार नाही. शांतता नांदावी व कायदा सुव्यस्थेसाठी करमाळा पोलीस प्रयत्न करत आहेत. कायद्याच्या विरोधात असणाऱ्यावर व कायदा हातात घेणाऱ्यावर कारवाई करू .
- रणजीत माने, पोलीस निरीक्षक, करमाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT