सोलापूर

Jaykumar Gore : मंत्री जयाभाऊंचे नियोजनबद्ध मायक्रो प्लॅनिंग लक्षवेधी

‘पदवीधर, शिक्षक’साठी भिरकिट : सोलापूर, सातारा जिल्ह्यात मताचा टक्का वाढला

पुढारी वृत्तसेवा
अविनाश कदम

खटाव : विधान परिषदेच्‍या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप-महायुतीच्या बाजूने सकारात्मक वातावरणनिर्मिती करण्यासाठी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेले नियोजनबद्ध मायक्रो प्लॅनिंग लक्षवेधी ठरले.

निवडणुकीच्या पूर्वतयारीपासून मतदारांशी संपर्क, बुथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांची बांधणी आणि मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मैदानात उतरून केलेले मार्गदर्शन, या सर्वच पातळ्यांवर मंत्री जयकुमार गोरे यांनी आखलेली रणनीती चर्चेचा विषय ठरली. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील वाढलेला मतदानाचा टक्का आणि माण-खटाव मतदारसंघातील मतदानासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळे मंत्री गोरे यांच्या परफेक्ट नियोजनाची चर्चा ऐकायला मिळत आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा आणि त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान मोठे असते. अशा निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व असल्याने केवळ प्रचारावर भर न देता मतदारांशी वैयक्तिक संपर्क, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे समन्वयपूर्ण जाळे, तसेच मतदानाच्या दिवशी प्रभावी यंत्रणा उभी करणे आवश्यक असते. हीच बाब लक्षात घेऊन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीपासूनच सूक्ष्म नियोजनावर भर दिला होता. पदवीधर मतदारसंघातून सौ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी जाहीर होताच सोलापूर जिल्ह्यात भाजप-महायुतीच्या बाजूने अनुकूल वातावरणनिर्मिती करण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय केले.

स्थानिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेत मतदारांशी संपर्क वाढवणे, विविध स्तरांवरील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे आणि मतदानासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. या प्रक्रियेत भाजप-महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबतच विरोधी गोटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही त्यांनी संपर्क वाढवला. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. येथे पदवीधरसाठी ७१ तर शिक्षकसाठी ८९ टक्के उच्चांकी मतदान झाले.

सोलापूर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांना मिळालेले यश हे मंत्री जयकुमार गोरे यांच्या नियोजनाचे महत्त्वाचे फलित मानले जात आहे. पदवीधर व शिक्षक मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण करणे, त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणे आणि मतदानाच्या दिवशी यंत्रणा सक्रिय ठेवणे, या बाबींचा वाढलेल्या मतदानात वाटा असल्याचे दिसून आले.

माण-खटाव मतदारसंघातही त्यांची स्पेशल टास्क फोर्स सर्व आयुधांनी फार अगोदरपासून तयारीत होती. विरोधी उमेदवार स्थानिक असल्याने या सर्वांनी विशेष तयारीवर भर दिला होता. मंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणुकीच्या दिवशी येथे स्वतः लक्ष घातले होते. दिवसभर विविध मतदान केंद्रांना भेटी देत त्यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मतदान प्रक्रियेचा आढावा घेत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत यंत्रणा सक्रिय राहिली. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही इर्षेने काम केल्यामुळे माण-खटावमधील वडूज, मायणी, पुसेसावळी, दहिवडी, म्हसवड परिसरात मतदानाचा टक्का वाढवण्यास हातभार लागल्याचे चित्र दिसून आले.

विशेष म्हणजे, पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीप्रमाणे केवळ मोठ्या सभांवर आणि व्यापक प्रचारावर अवलंबून नसते. या निवडणुकीत मतदारांशी वैयक्तिक संपर्क, त्यांची नोंदणी व मतदानाविषयीची जागरूकता, स्थानिक प्रश्नांची जाण आणि मतदानाच्या दिवशीची अचूक यंत्रणा यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. या पार्श्वभूमीवर मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेले सूक्ष्म नियोजन आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी साधलेला थेट संपर्क भाजप-महायुतीसाठी महत्त्वाचा ठरल्याचे दिसून आले.

माण, खटावमध्ये स्थानिक पातळीवर विविध राजकीय प्रवाह कार्यरत असतानाही भाजप-महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम केले. मतदान केंद्रनिहाय संपर्क, कार्यकर्त्यांची धावपळ आणि मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न यामुळे निवडणुकीच्या दिवशी जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मंत्री गोरे यांनी स्वतः मैदानात उतरून कार्यकर्त्यांना बळ दिल्यामुळे या प्रयत्नांना अधिक गती मिळाल्याचे चित्र दिसून आले. सातारा जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यामागे माण- खटाव परिसरातील वाढलेल्या मतदानाचाही वाटा महत्त्वाचा ठरला. एकीकडे सोलापूर जिल्ह्यात महायुतीला सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी केलेले प्रयत्न, तर दुसरीकडे माण - खटावमध्ये मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यकर्त्यांना दिलेले प्रोत्साहन, या दोन्ही बाबी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या निवडणूक व्यवस्थापनाची झलक दाखवणाऱ्या ठरल्या.

एकूणच, नियोजन, संघटन, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मैदानातील उपस्थिती या चतुःसूत्रीच्या बळावर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर आणि माण-खटाव परिसरात भाजप-महायुतीच्या यंत्रणेला सक्रिय ठेवले. वाढलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मायक्रो प्लॅनिंगची राजकीय वर्तुळात चर्चा होत असून, या नियोजनाचे अंतिम फलित निवडणुकीच्या निकालातून दिसून येईल असा विश्वासही मंत्री गोरेंनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT