खड्ड्यामुळे मोहोळजवळ दुधाचा टँकर उलटला 
सोलापूर

Solapur Accident : खड्ड्यामुळे मोहोळजवळ दुधाचा टँकर उलटला

सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ : मोहोळजवळील महामार्गावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे दुधाचा टँकर उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सर्व्हिस रस्त्याची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मोहोळ सोलापूर महामार्गावर मोहोळ परिसरातील सर्व्हिस रस्त्याबरोबरच मुख्य रस्त्यावर ही मोठमोठे खड्डे पडले असून, त्यातून वाहनांची वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. संबंधित रस्त्यावरून दररोज दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याची वेळेत दुरुस्ती होत नसल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून सोलापूर कडे निघालेला दुधाचा टँकर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौकातील उड्डाण पुलावरून खाली जात असताना मोठ्या खड्ड्यात गेल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टँकर रस्ता दुभाजकावर उलटला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने चालकाला इजा झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT