सोलापूर : यंदा सोलापूर जिल्ह्यावर मेघराजाने कृपाद़ृष्टी केली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच 13 जूनपर्यंत जिल्ह्यातील सातही मध्यम प्रकल्प शंभरीकडे वाटचाल करत आहेत. या प्रकल्पामध्ये सध्या सहा टीएमसी एवढा पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
मे महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. एकदा दुसरा दिवस अपवाद वगळता दररोज पाऊस बरसत आहे. पावसाच्या जोरदार बॅटिंंगमुळे एकरूख (हिप्परगा) तलाव, बोरी मध्यम प्रकल्प शंभर टक्कके भरले आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्ह्यात लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे 56 पाझर तलाव आहेत. मे महिन्यातील पावसाने जुनच्या पहिल्या पंधरड्यातच पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे तलावात पाणीसाठा वाढल्याने भूजल पातळीत वाढ होऊन विहीर, बोअरवेलची पाणीपातळी वाढली आहे.
जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेले उजनी धरण वरुणराजाने कृपाद़ृष्टी केल्याने मे महिन्यातच अधिक पातळीत आले आहे. आजअखेर धरणाची पाणीपातळी 45 टक्के एवढी झाली आहे. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या धरणात दौंड येथून 14 हजार 642 क्युसेकने पाणी येत आहे. त्याचबरोबर धरणक्षेत्र परिसरात पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
मागील वर्षी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात धरणाची पाणीपातळी वजा 53 टक्क्यांवर होती. ती पुढे जाऊन वजा 60 टक्क्यांपर्यंत गेली होती. मात्र, यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने मे महिन्यातच धरण अधिक पातळीत आले आहे.