उत्तर सोलापूर : बीएएमएस, बीएचएमएस या अभ्यासक्रमासाठी २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात हजर राहून प्रवेश घ्यावा लागणार आहे. याच दरम्यान संप असल्याने सलग चार दिवस बँका बंद आहेत. त्यामुळे बँकेतून महाविद्यालयाच्या प्रवेश शुल्काचा डीडी काढणे अशक्य आहे. याचा थेट परिणाम वैद्यकीय प्रवेशावर होणार आहे.
बीएएमएस व बीएचएमएस या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांनी २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहून प्रवेश घेण्यास सांगितले आहे. हा प्रवेश घेताना संबंधित महाविद्यालयाचे जे शुल्क आहे ते शुल्क डिमांड ड्राफ्ट अर्थात डीडीच्या स्वरूपात देणे बंधनकारक केले आहे. याच काळामध्ये म्हणजेच २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत बँका बंद आहेत.
बँका बंद असल्याने डीडी काढायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. डीडी न काढल्याने संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश आपोआप रद्द होणार आहेत. ज्या दिवशी प्रवेश घेणार आहे, त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल तर मात्र त्या विद्यार्थ्यांकडून धनादेश स्वीकारला जाणार आहे.