सोलापूर : मुंबई-पुणेमार्गे सोलापुरात एमडी ड्रग्ज आणणाऱ्या दोघांना जेलरोड पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. पोलिसांनी दीड लाख रुपयांच्या 47 ग्रॅम एमडी ड्रग्जसह चारचाकी गाडी जप्त केली आहे. तौसिफ फरिद सय्यद (वय 27, रा. कसबा पेठ, कुंभारवाडा, पुणे), सुफियान शब्बीर फुलारी (21, रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
विजापूर वेसेतून रुपाभवानी रस्त्याकडे एक पांढऱ्या रंगाची कार संशयतरित्या निघाली होती. संशय आल्याने पोलिसांनी त्या कारचा पाठलाग सुरु केला, पण कार भरधाव वेगाने पुढे तुळजापूरच्या दिशेने गेली. पोलिसांनी तामलवाडी पोलिसांना सांगून तेथे नाकाबंदी लावली. तामलवाडी टोल नाका येथील नाकाबंदी पाहून आरोपींन कार परिसरातील पिंपळा बु. गावाकडे नेली. त्या ठिकाणी कार सोडून तरुणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी पाठलाग करुन सुफियान याला पकडले त्यानंतर तौसिफ यालाही जेरबंद केले. कारच्या डिग्गीतून दीड लाख रुपयांचे 46.93 ग्रॅम मेफेड्रिन ड्रग्ज हस्तगत करण्यात आले.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मनोज मोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत दोघा आरोपींना सोलापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्याकडून सोलापुरात एमडी ड्रग्ज पुरवठ्याचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.