सोलापूर : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी तांत्रिक शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे.
एमसीए आणि एम.एचएमसीटी या दोन महत्त्वाच्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी आता दि. 18 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षांची तात्पुरती तारीख दि. 25 मार्च आणि दि. 30 मार्च 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे किंवा अन्य कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज भरता आले नाहीत, त्यांच्यासाठी ही विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यंदा नोंदणी प्रक्रियेसाठी एपीएआर आयडी आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांकडे अद्याप एपीएआर आयडी नाही, त्यांनी तो डिजीलॉकरच्या माध्यमातून त्वरित तयार करणे आवश्यक आहे, अन्यथा अर्जाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही.