सोलापूर : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कचरा संकलनासाठी जाणाऱ्या घंटागाड्या, स्वच्छता कर्मचारी व विभागीय अधिकारी यांनी परस्पर समन्वय ठेवून काम केल्यास नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही. प्रत्येक प्रभागात नियमित, वेळेत व प्रभावी कचरा संकलन होणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार प्रलंबित राहता कामा नये, असे आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सोलापूर शहरातील स्वच्छतेसंदर्भात मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, माजी महापौर श्रीकंचना यन्नम, नगरसेविका राजेश्री दोडमणी, नगरसेविका भरतसिंग बडूरवाले, नगरसेवक अजय पोनम, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल चराटे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकी दरम्यान घनकचरा विभागाचे सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांनी विभागाच्या आस्थापना विषयक बाबींसह कचरा संकलन यंत्रणा, यांत्रिक रोड स्वीपिंग मशीन, प्रेशरयुक्त पाण्याने स्वच्छता करणारी यंत्रणा, कचरा ट्रान्स्फर स्टेशन, सार्वजनिक स्वच्छालयांची स्वच्छता व दुरुस्ती, घंटागाडी व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली.
रस्त्यावरील आजोरा दाट झोपडपट्टी परिसरात कचरा संकलनासाठी स्वच्छता दीदी यांची नेमणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक स्वच्छतेच्या ठिकाणी आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात आल्या असून काही भागांत बोरवेल पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.