सोलापूर : घरात सीसीटीव्ही लावून ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच माहेरहून दोन लाख रुपये आण म्हणत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती आणि नणंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनुश्री प्रभाकर शिवशरण (वय-25, रा. आंबेडकर नगर विजापूर रोड सोलापूर) हिला पती प्रभाकर आणि नणंद पूजा वाघमारे हे सतत त्रास देत होते. सासूच्या मृत्यू नंतर आठ दिवसांनी पती आणि नणंदेने आई वडिलांकडून 2 लाख रुपये आणावेत या कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. नणंद पूजा वाघमारे हिने धनश्रीच्या घरात सीसीटिव्ही कॅमेरा व स्पाय कॅमेरा लावला होता.
घरातील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पती प्रभाकरला सोडचिठ्ठी देण्यास सांगितले. धनश्रीच्या फिर्यादीवरून प्रभाकर आणि पूजा वाघमारे यांच्या विरोधात सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सोनार करीत आहेत.