आष्टी येथे विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून जीवन संपवले File Photo
सोलापूर

आष्टी येथे विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून जीवन संपवले

सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : पुढारी वृत्तसेवा

सासू सासरे आणि दिराने घरातील किरकोळ कारणावरून विवाहितेला वारंवार मानसिक, शारीरिक त्रास दिल्याने त्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दि. २२ फेब्रुवारी रोजी पहाटे पावणे एक वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे उघडकीस आली. स्वप्नाली संग्राम हजारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी सासू-सासरे व दिराच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोपळे ता. पंढरपूर येथील तुषार सुनील कोळेकर यांची बहीण स्वप्नाली हिचे लग्न २७ एप्रिल २०१६ मध्ये मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील संग्राम सदाशिव हजारे यांच्यासोबत झाले होते. स्वप्नाली हीस बरेच वर्ष मुलबाळ होत नव्हते. दरम्यान तिला सासू, सासरे त्रास देत होते. उपचारानंतर तिला एक मुलगा व एक मुलगी झाली. स्वप्नाली हीचे पती संग्राम हजारे हे रेल्वेत गॅंगमन म्हणून नोकरीत आहेत. तसेच ट्रक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात.

ट्रक घेण्यासाठी स्वप्नाली हिच्या नावावर फायनान्सच्या माध्यमातून कर्ज काढले होते. त्या कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्सकडील लोक घरी येऊन स्वप्नाली हिला बोलून जात असत. त्या कारणावरून तिचे सासू-सासरे व दीर अण्णासाहेब हजारे हे शेतातील कामावरून घालून पाडून बोलत व भांडण काढत होते. अण्णासाहेब हजारे याने स्वप्नाली हिला मारहाणही केली होती. होत असलेल्या त्रासाबद्दल स्वप्नाली वारंवार कुटुंबातील सदस्यांना सांगत होती, आष्टीतीलच मावस भाऊ व मामा-मामींना सासू-सासरे व दिर असे तिघे मिळून त्रास देत असल्याने सहन होत नाही असेही स्वप्नाली सांगत होती असे म्‍हटले आहे.

दरम्यान दि. २२ फेब्रुवारी रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास स्वप्नालीचा मावस भाऊ स्वप्निल याने फिर्यादी तुषार कोळेकर याला फोन करून सांगितले की, स्वप्नाली ही घरातून बाहेर निघून गेली आहे. ती सापडत नाही. त्यानंतर थोड्या वेळाने त्याने फोन केला की, तिने शेतातील विहिरीत उडी मारली आहे. नातेवाईक, ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने विहिरीतील पाणी मोटरच्या साह्याने काढले असता, स्वप्नाली हिचे प्रेत आढळून आले. या प्रकरणी तुषार कोळेकर यांनी स्वप्नाली हिचे सासरे सदाशिव हजारे, सासू लता हजारे, दीर अण्णासाहेब हजारे या तिघांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT