सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील चारपैकी तीन कृषी उत्पन्न बाजार समित्या भाजपच्या ताब्यात आल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात केवळ कुर्डूवाडी बाजार समितीची सत्ता राहिली. शिंदे बंधूसमोर विरोधकांचा निभाव लागला नाही. पंढरपुरात परिचारक तर मंगळवेढ्यात अवताडे गटाने सर्व जागा जिंकत बाजार समिती ताब्यात ठेवली. अपेक्षेप्रमाणे अकलूज बाजार समिती ही मोहिते -पाटील यांच्या ताब्यात राहिली. मात्र, विरोधी गटाचे उत्तम जानकर विजयी झाले.
जिल्ह्यातील मतदान झालेल्या पाचपैकी चार बाजार समित्यांत मतांची मोजणी शनिवारी घेण्यात आली. पंढरपूर, कुर्डूवाडी (माढा), मंगळवेढा व अकलूज (माळशिरस) या बाजार समित्यांत मतदानाची मोजणी करण्यात आली. अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी रविवारी होणार आहे. पंढरपूर बाजार समितीच्या निवडणुकीत यापूर्वीच पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. येथे 13 जागांसाठी मतदान घेण्यात आले. या सर्व जागा परिचारक गटाने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत भालके -काळे गटाने तलवार म्यान केल्याने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी एकाकी झुंज दिली.
कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व 18 जागा सत्ताधारी आमदार शिंदे गटाने जिंकल्या. आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय शिंदे यांच्यासमोर शिवसेनेचे नेते प्रा. शिवाजी सावंत यांचा विरोध थिटा पडल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येत आहे. मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी शुक्रवारी रात्री घेण्यात आली. या निवडणुकीत यापूर्वीच 13 जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत उर्वरित पाच जागांसाठी मतदान घेण्यात आले.
निवडणुकीमध्ये बिनविरोध आलेले उमेदवार हे अवताडे गटाचे होते. अंतिम क्षणी समविचारी आघाडीने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अपक्षांनी ही निवडणूक लादली होती. मतदान घेण्यात आलेल्या पाचही जागा अवताडे गटाने जिंकल्या. या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे व बबनराव अवताडे हे दोन्ही गट एकत्र आले आहेत. अकलूज बाजार समितीमध्ये मोहिते -पाटील गटाविरुद्ध पारंपरिक विरोधक अशी निवडणूक झाली. येथे मोहिते पाटील गटांनी 18 पैकी 17 जागा जिंकत बाजार समितीवर सत्ता अबाधित ठेवली. सत्ताधारी गटाकडून सहकारी संस्था मतदारसंघातून मदनसिंह मोहिते पाटील हे विजयी झाले. विरोधी गटाचे उत्तम जानकर हे राखीव मतदारसंघातून तीस मतांनी विजयी झाले. मात्र शेतकरी विकास आघाडीकडून दोन जागांवर उभे असलेल्या पद्मजादेवी मोहिते -पाटील यांचा दोन्ही ठिकाणीही पराभव झाला. अकलूज येथे सकाळी मतमोजणीनंतर आक्षेप घेण्यात आला होता. यामुळे दुपारनंतर फेर मतमोजणी घेण्यात आली. मात्र या मतमोजणीत पहिल्या मतमोजणीतील मतांची संख्या कायम राहिली.