Devendra Kothe Pufhari
सोलापूर

Devendra Kothe: मनपाच्या 249 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा

शहरात नव्या एमआयडीसीची आवश्यकता : आ. देवेंद्र कोठेंची अधिवेशनात मागणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे 249 कर्मचारी 1995 पासून रोजंदारीवर काम करत आहेत. यातील काहींचे निधन झाले आहे तर यातील 80 टक्के कर्मचारी आगामी दोन-तीन वर्षांत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेप्रमाणे निर्णय घेऊन 249 कर्मचाऱ्यांना कायमसेवेत घ्यावे. शहरात नव्या एमआयडीसीची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात केली.

महाराष्ट्र सरकारने मंगळवेढा येथे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या स्मारकाचे काम रखडले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या स्मारकासाठीची जागा निश्चिती करण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात या स्मारकासाठी राज्य शासनाने भरीव निधी द्यावा, अशी मागणी आ. देवेंद्र कोठे यांनी केली.

सोलापूर शहरात असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन उद्योग उभारणीसाठी जागेच्या तुटवड्यामुळे नव्या जागा मिळणे जिकरीचे बनले आहे. सोलापुरात असलेल्या रे नगर, गोदूताई विडी घरकुल परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगारांची वस्ती असून नव्या औद्योगिक वसाहतीमुळे येथील कामगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे सोलापुरात नवीन औद्योगिक वसाहतीची उभारणी करावी, अशी मागणी आ. देवेंद्र कोठे यांनी केली.

सोलापूर शहरातील धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसराचा विकास करण्याची आवश्यकता आहे. या परिसराचा विकास झाला तर राज्यातून सोलापूर जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रांना येणाऱ्या पर्यटकांना शहरात पर्यटनासाठी चांगला पर्याय उपलब्ध होईल. तसेच तलावाचेही संवर्धन होईल. त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसराचा विकास करावा, अशी मागणी आ. देवेंद्र कोठे यांनी केली.

सोलापुरात सुमारे एक लाख कामगार राहतात. त्यांच्यासह गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा अल्पदरात मिळाव्यात, याकरिता आरोग्य विभागाकडून 250 खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारावे, अशी मागणीही आ. देवेंद्र कोठे यांनी राज्य सरकारकडे केली. राज्यातील क आणि ड वर्गातील महापालिकांसाठी डीपी रस्त्यांकरिता स्वतंत्र योजना मंजूर करण्याची आवश्यकता आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेप्रमाणे अमृत काल योजना सुरू केल्यास राज्यातील क आणि ड वर्गातील महापालिकांमधील डीपी रस्ते तयार करण्यासाठी मदत होईल, अशी आग्रही मागणी याप्रसंगी आ. देवेंद्र कोठे यांनी केली.

सोलापुरातील विडी उद्योग अडचणीत असल्यामुळे आगामी काळात येथील महिलांना तसेच पुरुषांना रोजगार मिळण्याकरिता युनिफॉर्म उद्योगावर काम करण्याची आवश्यकता आहे. शहरी विधानसभांना केवळ नगर विकास खात्याच्या निधीवरच अवलंबून रहावे लागते. इतर खात्यांचा निधी मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारने शहरी विधानसभांच्या विकासासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणीदेखील आ. देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT