वेळापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आणि 'सगेसोयरे' अध्यादेशासह सातारा, कोल्हापूर व पुणे गॅझेटियरची पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. २९ ऑगस्टच्या आंदोलनासाठी सर्व मराठा बांधवांनी सज्ज राहावे, अंतरवली सराटी हे आंदोलनाचे मुख्य केंद्र असले तरी गरज भासल्यास मराठा समाज ताकदीने मुंबईच्या दिशेने कूच करेल, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला.
माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी येथे सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भव्य सभेत ते बोलत होते. या सभेला संबोधित करताना जरांगे यांनी राज्य सरकार आणि राजकीय नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. शासनाकडून सापडलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे रद्द करण्याचे किंवा रोखण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेत्यांच्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली. समाजाच्या विरोधात काम करणाऱ्या आणि आंदोलनापासून दूर राहणाऱ्या मराठा नेत्यांवरही समाजाने बारीक लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.