गुळवंची (सोलापूर) : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची शासनाकडून दखल घेतली नाही. याच्या निषेधार्थ सोलापुरात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोमनाथ राऊत यांच्या नेतृत्वाखाली १० ते १५ आंदोलकांनी ठिय्या मारला. सोलापूर-पुणे महामार्गावरील सोलापूर विद्यापीठाजवळील २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले स्टाईल' अनोखे आंदोलन सुरू केले.
"कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही", "लढेंगे, जितेंगे, हम सब जरांगे", आणि "मराठा आरक्षणाची सनदशीर मागणी न मानणाऱ्या सरकारचा धिक्कार असो", अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शासनाने जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
दरम्यान, आंदोलक उच्च दाबाच्या २०० फूट उंच टाकीवर चढल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
या अचानक झालेल्या आंदोलनामुळे सोलापूर-पुणे महामार्गावरील परिसरात आणि सोलापूर विद्यापीठ परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.