मनोज जरांगे यांच्यावर जेसीबीमधून फूलांची उधळण करण्यात आली  
सोलापूर

Manoj Jarange | मराठ्यांच्या नादी लागू नका, २९ ऑगस्टला निर्णायक आंदोलन करून दिल्ली हादरवणार : मनोज जरांगे

जेसीबीमधून फुले उधळूण अनेक गावांमध्ये मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत

पुढारी वृत्तसेवा

गुळवंची : "मराठा समाजाच्या हक्कासाठी, आपल्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना प्रशासनात अधिकारी बनवण्यासाठी मी जीवाची बाजी लावून हा लढा लढत आहे. सरकारने आजवर गोड बोलून मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असून समाजावर मोठा अन्याय केला आहे. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. आगामी २९ ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन हे निर्णायक आणि शेवटची संधी असेल. संपूर्ण मराठा समाजाने कोणत्याही राजकारण्यांच्या आहारी न जाता, एकजुटीने व शांततेच्या मार्गाने या आंदोलनात सामील व्हावे आणि दिल्लीचे तख्त हादरवून सोडावे," असा घणाघाती इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सरकारचा माज उतरवण्याची वेळ आली आहे आपल्या घणाघाती भाषणात जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "मराठा समाजात गैरसमज आणि कुणबी नोंदींबाबत संभ्रम निर्माण करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. पडताळणी पूर्ण झालेले कुणबी दाखले केवळ सरकारच्या दबावामुळे रद्द करण्यात आले आहेत. नोंदी रद्द करण्यासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र दिले होते. परंतु, आम्ही ५८ लाख नोंदींचे सर्व दाखले घेतल्याशिवाय आणि सातारा, कोल्हापूर तसेच हैदराबाद गॅझेट लागू केल्याशिवाय आता शांत बसणार नाही."

पुढे बोलताना ते म्हणाले, "सरकारला बहुमतामुळे माज आला आहे, पण मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होते, हे दाखवून देण्याची आणि त्यांचा माज उतरवण्याची वेळ आता आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षातील लोकांची वेळीच चूक सुधारावी; अन्यथा आगामी काळात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे काही खरं नाही." तसेच, मराठा समाजाच्या इतर नेत्यांनीही आता पक्षाचे राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी जाहीरपणे मैदानात उतरले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

माझ्या दौऱ्यात गोंधळ घालण्याचा सरकारचा डाव

या आंदोलनात गोंधळ घालण्याचा सरकारचा कट असल्याचा संशय व्यक्त करत जरांगे पाटील म्हणाले, "माझ्या दौऱ्यातील पोलीस बंदोबस्त कमी करून जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने आजवर अनेक कटकारस्थाने रचली, पण मराठा समाजाच्या अभेद्य एकजुटीमुळे आपण ती उधळून लावली. या सरकारने केवळ मराठ्यांवरच नव्हे, तर सर्वच घटकांवर अन्याय केला असून शेतकऱ्यांचेही पूर्ण वाटोळे केले आहे. आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना निधी द्यावा, ही मागणी या आंदोलनात लावून धरली जाईल."

बांधासाठी भांडण्यापेक्षा कष्ट करून जमीन खरेदी करा.

समाजाला शिस्त व एकीचे आवाहन करत ते म्हणाले, "उच्च शिक्षण घेऊन समाजात अधिकारी वर्ग वाढवणे ही काळाची गरज आहे. तरुणांनी आळस झटकून कष्ट करावेत आणि व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहावे. शेतात दोन फुटांच्या बांधासाठी आपापसात भांडून आयुष्य वाया घालवण्यापेक्षा, कष्ट करा आणि नवीन एक एकर जमीन खरेदी करा. समाजात जे लोक नोकरी किंवा व्यवसायात स्थिर आहेत, त्यांनी आपल्याच समाजातील गरजू बांधवांना मदत केली पाहिजे. दुसऱ्या वरील अन्याय दूर करणाऱ्या मराठा समाजावर आज स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे २९ ऑगस्टचे आंदोलन पूर्ण ताकदीने, पण अत्यंत शांततेत पार पाडून इतिहास घडवा."

गावोगावी जरांगे पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत

उत्तर सोलापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे ग्रामीण भागात प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. तालुक्यातील बाळे, खेड, गुळवंची, कारंबा, अकोलेकाटी, नान्नज आणि वडाळा येथील ग्रामस्थांनी त्यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवर्षाव करत आणि फटाक्यांची मोठी आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत केले. या दौऱ्यात मराठा समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT