Manoj Jarange Devendra Fadnavis:
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण येत्या रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचीही उपस्थिती राहणार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे पाटील हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती आमदार समाधान अवताडे यांनी दिली आहे.
आमदार समाधान अवताडे यांनी या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, "छत्रपती शिवरायांच्या या अश्वारूढ पुतळा निर्माण व्हावा ही सर्व जाती, धर्म, पक्ष या सगळ्यांनी इच्छा होती. तेव्हा सर्वपक्षीय सगळ्यांच्या मागणीनुसार आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजित दादा पवार, छत्रपती संभाजी महाराज, आमचे मनोज दादा जरांगे या सर्वजणांना आम्ही निमंत्रण दिलं आहे. नक्कीच हे सर्वजण येतील.'
या समारंभात मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची उपस्थिती राहणार असल्याने, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील या पहिल्या सार्वजनिक भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मराठवाड्यातील अतीवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीबाबतचा देखील प्रश्न आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी घोषणा केली आहे. त्यामुळं या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर येणं याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.