सोलापूर : येथील नामवंत न्युरोफिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेली हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे - माने हिला शुक्रवारी (दि. 25) न्यायालयात हजर केले. त्यावेळी मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
मनीषाला शनिवारी (दि. 19) रात्री उशिरा अटक केली होती. त्यानंतर ती पाच दिवस पोलिस कोठडीत होती. या पाच दिवसांत तिच्याकडे पोलिसांनी कसूच चौकशी केली. तपासाकामी तिला हॉस्पिटलमध्येही आणले होते. या पाच दिवसांत पोलिसांना विशेष काही हाती लागले नाही.
शुक्रवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी मनीषाला पुन्हा न्यायालयात हजर केले. नव्या भारतीय न्यायसंहिता कायद्याच्या अनुषंगाने पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत मनीषाला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. ही मागणी मान्य करीत न्यायालयाने तिला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे याबाबत बोलताना म्हणाले, सोमवारी (दि. 28) मनीषाच्या जामीनासाठी अर्ज दाखल करु. दोन वेळेस त्याच मुद्यांवर पोलिस कोठडी देण्यात आली होती. मनिषाने (कै.) डॉ. शिरीष वळसंगकर यांना मेल पाठवून केवळ तक्रारी वजा अर्ज केला होता. मेलमधून तिची व्यथा मांडली होती. मेल प्राप्त झाल्यानंतर (कै.) डॉ. शिरीष यांनी तिला बोलावून घेतले. मनिषाने (कै.) डॉ. शिरीष आणि त्यांची पत्नी डॉ. उमा वळसंगकर यांची माफी मागितली होती. केवळ तिच्या मेलमुळे (कै.) डॉ. शिरीष यांनी आत्महत्या केली यावर आमचा आक्षेप असल्याचेही अॅड. नवगिरे यांनी सांगितले.
(कै.) डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येसाठी मनिषा ही जबाबदार आहे, अशी फिर्याद देण्यात आली. तिला अटक झाली. पोलिस कोठडीही मिळाली. त्यानंतर आता तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. या सर्व घडामोडीनंतर पोलिस ठोस निष्कर्षापर्यंत पोहचलेले दिसत नाहीत. पोलिसांचा तपास केवळ चिठ्ठी, मेल, मनिषा आणि तिचे आर्थिक गैरव्यवहार यापलीकडे गेला नाही. परंतु मनिषामुळेच (कै.) डॉ. शिरीष यांनी आत्महत्या केल्याचे सिध्द करण्यासाठी ठोस पुरावा मिळाला आहे की नाही हे देखील गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे (कै.) डॉ. शिरीष यांच्या आत्महत्या प्रकरणातील अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.