सोलापूर : न्यूरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा मुसळे-माने हिला गुरुवारी (दि. 15) न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी पोलिसांनी केली. ती न्यायालयाने मंजूर केली. डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात महिनाभरानंतर नवीन गोष्टींचा उलगडा करण्यासाठी मनीषा महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
मनीषाकडील आर्थिक व्यवहाराची चौकशी तसेच डॉ. शिरीष यांना बदनामीची धमकी दिल्याचा तपास करण्यासाठी मनीषाला दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी दिली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर गुरुवारी मनीषाला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. मनीषा तपासकामात सहकार्य करीत नाही, माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे.
मनीषाने अनेकांना धमकावून तिच्या बँक खात्यावर लाखो रुपयांची रक्कम टाकण्यास भाग पाडले. या साक्षीदारांनी तिच्यासमोर याची कबुली दिली आहे. या साक्षीदारांच्या तपासणीनंतर अनेक नव्या गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनीषाला पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार न्यायाधीश एस. एन. रथकंठवार यांनी मनीषाला 27 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गेल्या महिनाभरात मनीषाला पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी असा खेळ सुरू आहे. परंतु पोलिस अद्यापही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचले नाहीत.
मनीषाचा पोलिस कोठडीचा हक्क अबाधित राखत न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. ती न्यायालयाने मान्य करत 27 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. येत्या 21 मे रोजी मनीषाच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष म्हणणे सादर करणार आहे. त्यानंतर मनीषाच्या जामिनाबाबत न्यायालयात सुनावणी होईल.अॅड. प्रशांत नवगिरे, आरोपीचे वकील