तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील कृष्णा आनंद साठे (वय 36) याच्या खून प्रकरणात पोलिस तपासातून नवा ट्विस्ट समोर आला असून मयताची पत्नी प्रतिभा साठे (वय 28) व तिचा प्रियकर शुभम अर्जुन घाटुळे (वय 20) या दोघांचा या खून प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा खून केल्याची कबुली आरोपींनी पोलिस जबाबात दिली आहे.या प्रकरणात तिसऱ्या एका आरोपीची एन्ट्री झाली असून आणखी कुणाचा यामध्ये सहभाग आहे का याचाही पोलिस शोध घेत आहेत.
मयत कृष्णा साठे याला गॅस शेगडी आणण्याच्या बहाण्याने शेतात बोलावून घेतले.त्यानंतर आरोपींनी मंगरूळ-कसई शिवारातील शेतात नेऊन त्याच्या डोक्यात धारदार शस्त्र, काठी व दगडाने हल्ला करून त्याचा खून केला.त्यानंतर मृतदेह एका पोत्यात घालून टमटम बोलावून मृतदेह 100 फूट फरफटत नेवून ओढ्याच्या काठावर नेवून टाकण्यात आला.पूर्वनियोजित कट रचून केलेल्या खून प्रकरणाचा छडा लावणे पोलिस यंत्रणेसाठी एक आव्हानच होते.
मात्र या घटनेला 24 तास उलटण्यापुर्वीच पोलिसांनी या खूनामागचे धागेदोरे धोधून काढीत मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.निलेश देशमुख, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सपोनि एन.एस.मद्दे, उपनिरीक्षक विजय थोटे, बीट अंमलदार महादेव राऊत,संतोष करवार, विक्रम सावंत अदिंनी सीसीटिव्ही फुटेज, गोपनीय माहितीच्या आधारे कसोशीने तपास पुढे नेला.