मोहोळ : कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट शेतकर्यांची पाठ सोडत नाही. या संकटांमुळे शेतकरी पुरता गांजला गेला आहे सलग तीन दिवस झालेल्या वादळी वार्यासह आलेल्या पावसाने मोहोळ तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले.
नरखेड व परिसरातील देगाव, वाळूज, मनगोळी, भैरववाडी, मसले चौधरी, एकुरके, बोपले, भोयरे, हिंगणी यासह तालुक्याच्या दक्षिण भागातील कुरुल, कामती, अंकोली, बेगमपूर तसेच पूर्व भागातील लांबोटी, शिरापूर, खुनेश्वरसह अनेक गावांत शुक्रवार, शनिवार व रविवारी सलग तीन दिवस झालेल्या वादळी वार्याने आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री वातावरणात अचानक बदल होऊन मोठ्या प्रमाणात वादळी वारे, विजचा कडकडाटासह कुठे जोराचा तर कुठे रिमझिम पावसामुळे उतरणीला आलेल्या आंबा बागांना मोठा फटका बसला. देगाव येथील विजयकुमार पोतदार यांच्या पाच एकर आंबा बागेचे वादळी वार्याने अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले. त्याचबरोबर शेतातील कडबा, वस्तीवरील पत्रे जोरदार वारे असल्याने उडून गेले. या वादळ वार्याने आंबा उत्पादक तसेच इतर फळ पिकांबरोबरच फुल उत्पादक शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाची शासनाने महसूल विभागामार्फत पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.