मंगळवेढा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववस्ती, केंद्र सलगर बु. येथे शिक्षकांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर अखेर प्रशासनाने तातडीची दखल घेतली आहे. पालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर गटशिक्षणाधिकारी यांनी तत्काळ कायमस्वरूपी शिक्षकाची नेमणूक केली.
जाधववस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ते 4 मध्ये 28 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाळा शिक्षकांविना होती. 11 डिसेंबर रोजी शिक्षक प्रतिनियुक्तीचा लेखी आदेश देऊनही संबंधित शिक्षक रुजू न झाल्याने शाळेचे कामकाज ठप्प झाले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. पंचायत समिती शिक्षण विभागाने यापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धायगोंडेवस्ती, सलगर बु. येथील शिक्षकाची पुढील आदेश होईपर्यंत जाधववस्ती शाळेत प्रतिनियुक्ती केली होती. मात्र, लेखी आदेश असूनही शिक्षक रुजू न झाल्याने शाळा प्रत्यक्षात शून्य शिक्षक अवस्थेतच राहिली होती. गटशिक्षणाधिकारी यांनी तत्काळ कायमस्वरूपी शिक्षकाची नेमणूक केल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण पुन्हा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.