SSC Exam Pudhari File Photo
सोलापूर

SSC Exam : नंदेश्वर केंद्रावर दहा बोगस विद्यार्थी पकडले

10 वीच्या मराठी पेपरवेळी प्रकार; लक्ष्मी दहिवडी येथील सुतार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी

पुढारी वृत्तसेवा

मंगळवेढा : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर दि. 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या मराठी विषयाच्या परीक्षेत तब्बल 10 बोगस विद्यार्थी परीक्षा देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे सर्व विद्यार्थी सुतार इंटरनॅशनल स्कूल, लक्ष्मी दहिवडी येथील असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या बोगस विद्यार्थ्यांच्या प्रकरणात लक्ष्मी दहिवडी येथील शाळाच केंद्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे 10 वी परीक्षेचे केंद्र क्रमांक 3184 आहे. केंद्र संचालक विठ्ठल निवृत्ती एकमल्ले व उपकेंद्र संचालक यांनी परीक्षेदरम्यान प्रवेशपत्रे व ओळखपत्रांची तपासणी केली असता संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यामध्ये लक्ष्मी दहिवडी येथील सुतार इंटरनॅशनल स्कूलचे नऊ विद्यार्थी व एक विद्यार्थिनी इतर परीक्षार्थींच्या नावावर मराठीचा पेपर सोडवत असल्याचे निष्पन्न झाले. मूळ परीक्षार्थी नंदेश्वर केंद्रावर अनुपस्थित असताना, त्यांच्या जागी दुसऱ्यांनाच बसवण्यात आल्याने हा प्रकार सुनियोजित असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. पकडण्यात आलेल्या सर्व बोगस विद्यार्थ्यांवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच संबंधित मूळ परीक्षार्थी, शाळा प्रशासन व या गैरप्रकारामागील सूत्रधारांची चौकशी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे. पुढील तपासाची दिशा आता लक्ष्मी दहिवडीतील शाळेकडे वळली आहे.

दरम्यान, दहावी सारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेत लक्ष्मी दहिवडी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांचा थेट सहभाग आढळल्याने शिक्षण व्यवस्थेवर काळा डाग लागला आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या या प्रकारात शाळा प्रशासनाची भूमिका काय? बोगस विद्यार्थ्यांची निवड कोणी केली? आर्थिक व्यवहार झाले का? असे अनेक जळजळीत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

प्रत्येक वर्गखोलीत तोतया परीक्षार्थी

नंदेश्वर परीक्षा केंद्रावर एकूण 14 वर्गखोल्यांमध्ये दहावीची परीक्षा सुरू होती. सुरुवातीला खोली क्रमांक 8 मध्ये दोन संशयित विद्यार्थी सापडले. यानंतर संपूर्ण केंद्रात तपासणी सुरू करण्यात आली. त्यावेळी जवळपास प्रत्येक वर्गखोलीत बोगस परीक्षार्थी आढळून आले. त्यामुळे हा प्रकार काही मोजक्या व्यक्तींचा नसून, लक्ष्मी दहिवडी येथील शाळेतूनच नियोजनबद्धरीत्या तोतया विद्यार्थी पाठवले गेले का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

येथील बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर येथील परीक्षा केंद्रावर दहा रेग्यलूर विद्यार्थ्यांच्या जागी बोगस विद्यार्थी आढळले आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची खोलवर चौकशी करुन कायदेशीर कारवाई करणार आहे.
सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT