मंगळवेढा : नगरपरिषदेसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकमेव अर्ज आला आहे. मंगळवेढ्यातील प्रभाग पाच ब मधील मागास प्रवर्गमधून मोहम्मदमुस्तफा अहमद मुलाणी यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्यातील एक अपक्ष तर एक भाजपच्या नावे अर्ज दाखल केला आहे.
भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून पक्षाला उमेदवारी मागणी अर्ज भरून घेतले आहेत. मंगळवेढा शहरातून एकूण 10 प्रभागांमधून एकूण 20 जागेसाठी 66 जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागणी अर्ज केला आहे. नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील महिलेला आरक्षित असल्याने या प्रवर्गासाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. यात भारतीय जनता पक्षाचे राज्य सदस्य तथा मंगळवेढा नगरपालिका निवडणूक प्रभारी राजेंद्र सुरवसे यांच्या पत्नी राधाताई राजेंद्र सुरवसे व शिवशंभो प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रा. तेजस्विनी सुजित कदम यांनी मागणी केली आहे.
आ. समाधान आवताडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी या नगरपालिकेच्या निवडणुकीला गांभीर्याने घेतले आहे. यावेळी कसल्याही परिस्थितीमध्ये नगरपालिकेमध्ये कमळ फुलवण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. भाजपच्या गोटातून उमेदवारी मिळवण्यासाठी शहरातील अनेकांनी आपल्या गॉडफादरमार्फत फिल्डिंग लावली आहे. अद्याप महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेबरोबर बोलणे सुरू असल्याने नेमके किती जागी भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.
मात्र, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी शहरातील सर्व जागेवर भाजपचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहतील, असे सांगितले आहे. यामुळे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेची भूमिका काय असेल, याकडे शहरातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.