Mangalvedha fraud News: मंगळवेढ्यात महा ई-सेवा ऑनलाईन केंद्रातून नागरिकांची आर्थिक लूट File Photo
सोलापूर

Mangalvedha fraud News: मंगळवेढ्यात महा ई-सेवा ऑनलाईन केंद्रातून नागरिकांची आर्थिक लूट

जिल्हाधिकारी यांचा आदेश धाब्यावर; प्रांत अधिकार्‍यांनी तहसीलदार यांना दिले चौकशीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील महा ई-सेवा ऑनलाईन केंद्रातून शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची शासकीय दरापेक्षा अधिक पैसे घेवून मोठी लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची दखल खुद्द प्रांत अधिकारी बी.आर.माळी यांनी घेतली आहे. या बाबतचे लेखी पत्र मंगळवेढा तहसीलदार यांना देवून सर्व महा ई-सेवा ऑनलाईन केंद्राची तपासणी करा आणि तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिला आहे. या आदेशाने महा ई-सेवा केंद्रामधून प्रचंड खळबळ उडाली आहे.

मंगळवेढा तालुक्यात जवळपास शहर व ग्रामीण भागात 83 महा ई-सेवा ऑनलाईन केंद्र आहेत. मंगळवेढा शहरात तहसील कार्यालय परिसरात ठराविक महा ई -सेवा ऑनलाईन सेवा केंद्राना परवानगी आहे. असे असताना या परिसरात चक्क ऑनलाईन केंद्राचा बाजार भरला असल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी महा ई -सेवा ऑनलाईन केंद्राला मंजुरी दिली. त्या ठिकाणी केंद्र चालवणे शासकीय नियमाप्रमाणे अपेक्षित असताना मनमानी पद्धतीने ही केंद्रे उभारली आहेत. यापूर्वीही अनेक वेळा वृत्तपत्रात बातम्या येवूनही तहसील कार्यालयाकडून कुठलीच कारवाई न करता ऑनलाईन केंद्र वाल्याची पाठराखण केल्याचा आरोपही नागरिकांनी केला. याबाबत महसूल अधिकार्‍यांकडे विचारणा केल्यावर आज कारवाई करतो? उद्या कारवाई करतो ? असे म्हणून आतापर्यंत चालढकल केली आहे.

दरम्यान, खुद्द प्रांत अधिकार्‍यांनीच याची दखल घेतल्याने सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे. उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला व इतर सर्व दाखले काढण्यासाठी शासकीय दर 70 रुपये इतके असताना एका राष्ट्रवादी पक्षाच्या महिलेकडून चक्क 600 रुपये फी घेण्याचा प्रकार घडल्याने हे सर्व प्रकरण बाहेर आले आहे. महसूल अधिकार्‍याच्या टेबलवर सह्यासाठी दाखल्यांचे ढिगारेच्या ढिगारे लागतात. मात्र यावर लवकर अधिकारीही वजन ठेवल्याशिवाय सह्या करत नसल्याच्या तक्रारी आहेत. हे सर्व कामकाज ऑनलाईन केंद्र चालक ते महसूल अधिकारी अशा साखळी पद्धतीने चालत असल्याने चिरीमिरी शिवाय दाखलेच तयार होत नसल्याचा आरोपही काही केंद्र चालकांनी प्रसारमाध्यमाजवळ व्यक्त केला आहे.

एकाही महा ई सेवा ऑनलाईन केंद्रामध्ये शासकीय दरपत्रक लावले नाही. असे असतानाही महसूल खात्याकडून त्याची साधी तपासणीही केली जात नाही. जिल्हाधिकार्‍यांनी विविध दाखल्यासाठी फी घेताना स्कॅनर दिले असून महा ई सेवा केंद्र चालक याला बगल देवून जादा पैसे रोख स्वरूपात घेत आहेत. एकीकडे जिल्हा प्रशासन भ्रष्टाचार थांबवण्याचा प्रयत्न करीत असताना याला ऑनलाईन केंद्र चालक पळवाट काढून भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे विदारक चित्र मंगळवेढ्यात पहावयास मिळत आहे.

जादा पैसे घेणार्‍या केंद्रांवर कारवाईचे लेखी आदेश

महा ई-सेवा ऑनलाईन केंद्र चालक शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा रक्कम घेत असल्याचे लेखी तक्रार राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष आशाताई मेटकरी, संगीता कट्टे यांनी प्रांत अधिकारी बी.आर.माळी यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेवून प्रांत अधिकार्‍यांनी तहसीलदार यांना पत्र काढले आहे. जादा पैसे घेणार्‍या केंद्रावर कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले. या केंद्राची तपासणी करून अनियमितता संबंधितावर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT