सोलापूर : विद्यापीठाकडून मंगलताई शहा यांना जीवनगौरव पुरस्कार File Photo
सोलापूर

सोलापूर : विद्यापीठाकडून मंगलताई शहा यांना जीवनगौरव पुरस्कार

अनाथ बालकांच्या संगोपनाबरोबरच स्त्रियांना स्वावलंबी बनविणारी पालवी संस्था

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मंगलताई शहा यांना जाहीर झाल्याची घोषणा कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिना निमित्त शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी विद्यापीठात कार्यक्रम आयोजिला आहे. या सोहळ्यात पालवी संस्थेला सामाजिक क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पुरस्कार देऊन मंगलताई शहा यांचा सन्मान होईल. याचबरोबर विद्यापीठाच्या विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते, त्यानुसार तज्ञ समितीने विविध पुरस्कारांची देखील निवड केली आहे. या ही पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी होणार आहे. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पालवी संस्था बनली अनेकांचे आधारवड

एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरता मंगलताई शहा यांनी 2001 मध्ये पंढरपूरमध्ये ‘पालवी’ नावाची संस्था स्थापन केली. दोन मुलांच्या प्रवेशापासून सुरू झालेली ही संस्था आता विविध अंगांनी विस्तारली आहे. संस्थेने या मुलांकरता स्वत:ची शाळा, गोशाळा सुरू केली आहे. एडसग्रस्त अनाथ बालकांबरोबरच अत्याचार पीडित कुमारी माता, मनोरुग्ण माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो. परित्यक्ता, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला जातो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई काम, शेती काम, प्लंबिंग इत्यादी कामे त्यांना शिकवली जातात. याखेरीजही संस्थेतर्फे वंचितांकरता अनेक प्रकल्प राबवले जातात. मंगलाताईंनी प्रभा-हिरा प्रतिष्ठानच्या अंतर्गत ‘पालवी’ या संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेचा असा विश्वास आहे की, जन्माला आलेली सर्व बालके समान आहेत आणि आरोग्य, शिक्षण, सुरक्षित आणि कलंकमुक्त वातावरणासह प्रेमळ, आनंदाने भरलेले बालपण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.

पुरस्काराचे स्वरूप

एचआयव्ही एड्सग्रस्त अनाथ बालकांचे संगोपन व त्यांना शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मंगलताई शहा करतात. रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT