कामती : वाळू ठेक्याच्या पैशाच्या वादातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला कारमध्ये डांबून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना मोहोळ तालुक्यातील मिरी येथे घडली आहे. याप्रकरणी कामती पोलीस ठाण्यात पाच जण आणि इतर दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या घटनेतील फिर्यादी नितीन धोंडीराम भोसले (वय ३३. राहणार सरकोली ता. पंढरपूर) हे १ मे. २०२६ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मिरी गावचे शिवारात भीमा नदीपात्राजवळ रोडवर थांबले होते. यावेळी वाळू ठेक्याच्या पैशाच्या कारणावरून आरोपींनी त्यांना गाठले आरोपी स्वप्नील आसबे आणि सुरज आटकळे यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने त्यांच्या दोन्ही पायावर मारून गंभीर जखमी केले. इतक्यावरच न थांबता आरोपींनी नितीन यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे पाय दोरीने बांधले आणि जबरदस्तीने कार मध्ये डांबून त्यांचे अपहरण केले. काही अंतरावर नेऊन त्यांना पुन्हा लाथा बुक्यानी बेदम मारहाण करण्यात आली.
यावेळी फिर्यादीच्या सोबत असलेल्या उमेश भोसले यांनाही शिवीगाळ करण्यात आली. या हल्ल्यादरम्यान आरोपीने फिर्यादी जवळील वाळू ठेक्याचे १ लाख १० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले तसेच कारच्या काचा फोडून नुकसान केले. जखमी नितीन भोसले यांच्यावर सध्या मंगळवेढा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी स्वप्निल भाऊसाहेब असबे, सुरज आटकळे विक्रम असबे, दीपक ज्योतिबा घंटे, दीपक अरुण सूर्यवंशी, (रा. सर्व गोपाळपूर व शेगाव बु) यांच्यासह अन्य दोघांवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी स्वप्नील आसबे, दीपक घंटे आणि दीपक सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे. कामतीचे पोलीस उपनिरीक्षक दीक्षित या प्रकरणाचा तपास करीत आहेत.