मळोली : मळोली (ता. माळशिरस) येथील मळोली-तांदुळवाडी हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या कामावरती काम करणारे ठेकेदार मात्र या कामातील गुणवत्ता ढासळण्याचे काम करीत आहे. ज्या पद्धतीने शासनाने कामाची पद्धत ठरवून दिली आहे, त्या पद्धतीने काम होत नसल्याने या भागातील अनेक शेतकरी व तरुण युवकांनी याबद्दल तक्रारी दिल्या आहेत.
शासकीय स्तरावर कोणीही या कामाची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी आलेले दिसून आलेले नाही. जरी त्यांनी सदर कामास भेट दिली असती तर अशा पद्धतीने होणारे काम स्थगित ठेवण्याचे आदेश काढले असते. या मार्गांवर सध्या ऊस वाहतूक चालू असून वीस ते तीस टनाच्या जवळपास वजन असणारी अवजड वाहने यावरून वाहतूक करीत आहेत. या ठेकेदाराने काम चालू असताना रोडच्या बाजूस असलेली खडी मजुरांच्या माध्यमातून उचलून न पसरता ट्रॅक्टरच्या पुढच्या फळीच्या माध्यमातून पसरून खडीसोबत मातीसुद्धा यामध्ये एकत्र करण्याचे काम केले आहे. त्यामुळे डांबर व माती हे दोन घटक एकत्र होत आहेत.
अशी स्थानिक शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते यांनी कामाची तक्रार केल्यानंतर त्यावर पाणी मारण्यात आले. तरीही आज सद्यस्थितीत अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला आहे. भले मोठे बजेट असणारा हा रस्ता कमी कालावधीतच पूर्वस्थितीत होणार, अशी चिन्हे दिसू लागलेली आहेत. या रस्त्यास जोडणारे शेतातून येणारे सहा ते सात रस्ते असून हा रस्ता अधिक मजबूत असणे आवश्यक आहे.