सोलापूर : भारताचा प्राचीन आणि गौरवशाली क्रीडा प्रकार असलेला मल्लखांब आजही नव्या पिढीला प्रेरणा देत आपली ओळख कायम ठेवत आहे. केवळ एक खेळ नसून, शारीरिक कौशल्य, मानसिक शिस्त आणि सांस्कृतिक वारसा यांचा हा एक अनोखा संगम आहे. जर्मनीतील कोलोन विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, कमी वेळेत संपूर्ण शरीराला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडा प्रकार म्हणून मल्लखांबाची नोंद झाली आहे.
मल्लखांबाची मुळे 12 व्या शतकात रुजलेली असून, त्याचे उल्लेख मानस उल्हास सारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात. या कलेला नवसंजीवनी देण्याचे श्रेय गुरुवर्य बाळभट्ट दादा देवधर यांना जाते. मल्लखांब म्हणजे मल्लम (पैलवान) आणि खांब (लाकडी पोल) यांचे मिश्रण. पूर्वी कुस्तीपटू आपली ताकद आणि चपळता वाढवण्यासाठी याचा उपयोग करत असत. मल्लखांबामुळे शरीरातील चपळता, लवचिकता आणि स्नायूंची बळकटी वाढते. पुरलेला मल्लखांब, रोप मल्लखांब, दोरीवरील मल्लखांब आणि टांगता मल्लखांब असे त्याचे प्रकार आहेत.
कमी वेळेत प्रत्येक स्नायूला व्यायाम मिळतो. हातांचे, खांद्यांचे, पोटाचे आणि पायांचे स्नायू बळकट होतात. शरीराला लवचिक बनवते, गुरुत्वाकर्षणाविरुद्ध शरीराचा तोल सांभाळण्याची क्षमता वाढते आणि अवघड कसरती करताना शारीरिक समन्वय सुधारतो. शरीरातील चपळता वाढते, ज्यामुळे जलद आणि नियंत्रित हालचाली करणे शक्य होते. नियमित सरावाने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित क्षमता वाढते.
प्राचीन काळापासून राणी लक्ष्मीबाई, छत्रपती संभाजी महाराजांसारख्या वीरांनी सराव केलेला मल्लखांब, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रात्यक्षिके आणि 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये सादरीकरण करून या भारतीय खेळाने जागतिक व्यासपीठावर भारताचा गौरव वाढविला आहे.
शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक आरोग्य आणि शिस्त यामध्ये मल्लखांब मोलाची भूमिका बजावतो. आज जागतिक स्तरावर त्याला मिळत असलेली ओळख ही भारतीय परंपरेचा गौरव आहे. येत्या काळात मल्लखांब हा अनेकांसाठी निरोगी जीवनाचे माध्यम बनेल.- पांडुरंग वाघमारे, मल्लखांब प्रशिक्षक