Solapur Politics 
सोलापूर

Solapur Politics: प्रमुख पक्ष गोंधळात तर आघाडीत बसेना ताळमेळ

मंगळवेढ्यात भाजपकडून प्रचाराला सुरुवात; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

पुढारी वृत्तसेवा
सचिन इंगळे

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यावतीने अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले, तरी अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील राजकीय समीकरणे पाहता स्व. भारत भालके यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणारे भगीरथ भालके यांना ग्रामीण भागातील जनतेचा पाठिंबा असल्याचे चित्र आहे. स्व. भारत भालके यांनी ग्रामीण भागात केलेल्या विकासकामांचा विश्वास आजही जनतेच्या मनात असून तो भगीरथ भालके यांच्या पाठीशी उभा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक गटांत भालके गटाकडे ताकदीचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे.

दुसरीकडे, आ. समाधान आवताडे यांच्याकडे विकासाचे स्पष्ट व्हिजन, प्रशासकीय अनुभव आणि व्यापक जनसंपर्क आहे. त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देत ही निवडणूक जिंकण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते. भाजपच्यावतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. प्रत्येक गटात सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवार पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजवित आहेत.

मात्र, भाजप वगळता इतर प्रमुख पक्षांमध्ये सध्या समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. अंतर्गत मतभेद आणि गटबाजी उघडपणे समोर येत असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. या परिस्थितीचा फटका उमेदवार निवड प्रक्रियेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर बबनराव आवताडे आणि लक्ष्मण ढोबळे यांची ग्रामीण भागातील ताकदही दुर्लक्षित करता येणार नाही. दोन्ही नेत्यांचा स्थानिक पातळीवर प्रभाव असून त्यांच्या भूमिकेमुळे काही गटांतील निवडणूक चित्र बदलू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT