पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. काल उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. मात्र, या बंदला मुंबई उच्च न्यायाण्याने बेकायदेशीर ठरवत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक मागे घेत मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मुक आंदोलने केली. त्या पार्श्वभूमीवर पंढपुरातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच काँग्रेसच्या वतीने काळ्या फिती लावून राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवसेनेचे माढा विभाग सह संपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव यांनी राज्य सरकार तसेच गृहविभागाच्या अनास्थेबद्दल संताप व्यक्त करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तर शिवसेना ठाकरे गटाचे पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी बोलताना राज्यात आठ दिवसात १२ घटना घडल्या, मात्र राज्य शासन आणि गृहविभाग बघ्याची भूमिका घेत आहे असा आरोप करीत राज्य शासनाचा निषेध केला.
तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर शहर अध्यक्ष सुभाष भोसले, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अमर सुरवसे तसेच माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांनीही राज्य सरकार आणि गृहविभाग राज्यात महिलांवर, बालिकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यात अपयशी ठरत आहे अशी टीका केली.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, तालुका प्रमुख बंडू घोडके, शहर प्रमुख रवी मुळे, सिद्धेश्वर कोरे, काका बुराडे, तानाजी मोरे, विनय वनारे, सचिन बंदपट्टे, नागेश रीतुंड, संजय घोडके, उत्तम कराळे, अर्जुन भोसले, हनुमंत भोसले, रणजीत कदम, कल्याण कदम, अनिल रोंगे, दिलीप दुधाडे, अनिल कांबळे, विजय बागल, ॲडव्होकेट पुनम अभंगराव, संगीता पवार, पूर्वा पांढरे, मंजुळा धोडमिसे महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला देखील मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.