सोलापूर : पैसा आणि ताकद याचा वापर करून भाजप सत्तेवर येऊ पाहत आहे. काहीही करा, पण सत्ता मिळवा. एखाद्याचा जीव गेला तरी चालेल. पण सत्ता हाशील करता आली पाहिजे. अशी प्रवृत्ती सध्या भारतीय जनता पार्टीची झालेली आहे. त्यांच्या या राक्षसी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आम्ही विरोध करीत राहू, असे मत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महाविकास आघाडीच्या माध्यमातून मूक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार शिंदे बोलत होत्या. या मूक आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, उबाठा शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. अजय दासरी, शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड, मनसेचे राज्य संघटक दिलीप धोत्रे, शहराध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, शिवसेना उबाठा शहर प्रमुख महेश धाराशिवकार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम, मेजर युसुफ शेख, अशोक निंबर्गी, प्रसिद्धीप्रमुख तिरुपती परकीपंडला आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, उबाठा शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या महाविकास आघाडी मधील पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूर महानगरपालिका निवडणुक उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून झालेल्या खुनी हल्ल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेना प्रमुख बाळासाहेब सरवदे या युवकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महाविकास आघाडीच्यावतीने शांततेत मुक आंदोलन करण्यात आले.
खासदार शिंदे म्हणाल्या की, सरवदे यांच्या खुनामुळे भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. कारण पैसा सत्ता नाही तर आता ते रक्तावर येऊन थांबलेत. लोकांच्या सेवेसाठी सत्ता नको. जीव घेऊन सत्तेत येण्यासाठी त्यांचा प्रयत्न, कटकारस्थान पहिल्यापासून चालू आहे. दोन कुटुंबात भांडणे लावून त्यात एका जीवाचा सत्तेसाठी, बिनविरोध होण्यासाठी बळी दिला गेला आहे. फक्त सोलापुरात नाहीये ठीक ठिकाणी भाजपचा हा खेळ चालू आहे. लोकशाही आणि संविधानाचा वारंवार अपमान होत आहे. भाजप निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे सिद्ध झालेले आहे. यामुळे भाजपच्या कटकारस्थान विरोधात, शासन प्रशासन विरोधात मुक आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी महाविकास आघाडीच्यावतीने सरवदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.