महात्मा जोतिराव फुले pudhari photo
सोलापूर

मानवतावाद हा धर्मनिरपेक्ष असतो हीच महात्मा फुलेंची धारणा

Mahatma Phule birth anniversary: महात्मा जोतिराव फुले यांचा वैचारिक आणि सक्रिय संघर्ष अन्यायकारी विचारप्रणालीच्या विरोधात

पुढारी वृत्तसेवा

महात्मा जोतिराव फुले यांचा वैचारिक आणि सक्रिय संघर्ष हा विशिष्ट एका जाती-वर्णाच्या विरोधात नव्हता, तर तो अन्यायकारी विचारप्रणालीच्या विरोधात होता. 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. तेव्हा सर्व धर्माच्या आणि जातीपातींच्या लोकांनी आपआपल्या परीने योगदान दिले होते. मुलींच्या शाळेसाठी आपला वाडा उपलब्ध करून देणारे भिडे हे ब्राह्मण होते. मोरोपंत वाळवेकर जोतिरावांचे ब्राह्मण मित्र होते. महात्मा फुले यांनी शूद्रातिशूद्रांसाठी काढलेल्या शाळेला जागा मिळावी म्हणून मोरोपंत वाळवेकरांनी ब्रिटिशांकडे अर्ज केला होता. महात्मा फुले यांनी शैक्षणिक कार्यासाठी स्थापन केलेल्या समितीत मोरोपंत वाळवेकर हे चिटणीस होते. महात्मा फुले यांनी लिहिलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ वाळवेकरांनी छापला होता.

सदाशिव गोवंडे हेदेखील जोतिरावांचे ब्राह्मण मित्र होते. ते काही काळ नगर येथे नोकरी करत होते. त्यावेळेस त्यांनी जोतिरावांना नगरला बोलाविले. अमेरिकन मिशनच्या वतीने मिस फरार मुलींची शाळा चालवत होत्या. या शाळेचे कामकाज कसे चालते हे जोतिरावांनी पहावे असे त्यांना वाटे. महात्मा फुले यांनी काढलेल्या मुलींच्या शाळेसाठी त्यांनी आर्थिक सहाय्य केले होते. वस्ताद लहुजी साळवे हे मांग समाजाचे होते. जे महात्मा जोतिराव फुले यांचे गुरू होते.

मुस्लिम धर्माचे गफारचाचा, उस्मान शेख, फातिमा शेख यांनी सहकार्य करून जोतिराव व सावित्रीबाई यांना नैतिक बळ दिले. जोतिराव फुले स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिकत असताना केशवभट्ट प्रकरणामुळे त्यांचे वडील गोविंदराव फुले जोतिरावांचे पुढील शिकणे बंद करत होते, तेव्हा वडीलधारे असलेल्या गफारचाचांनी गोविंदरावांची समजूत घातली व जोतिरावांचे बंद पडलेले शिक्षण सुरू करण्यासाठी गोविंदरावांना नैतिक बळ दिले. महात्मा फुले यांना जातीच्या लोकांनी वाळीत टाकले व घराबाहेर काढले तेव्हा उस्मान शेख या मुस्लिम मित्राने त्यांना आश्रय दिला. फातीमा शेख यांनी सावित्रीबाईंच्या कार्यात सहकार्य केले. ज्या ब्रिटिशांनी, ख्रिश्चन धर्माच्या लोकांनी आपल्यावर राज्य केले त्यांनी मिशन शाळेतूनच जोतिरावांना शिक्षण दिले.मिचेलबाईंच्या स्कूलमध्ये सावित्रीबाईंनी शिक्षिकेचे प्रशिक्षण घेतले. सगळ्यात महत्त्वाचे बोटीतून येणारी पुस्तके लिजीटसाहेब जोतिरावांच्या हाती ठेवत. याच पुस्तकात जोतिरावांना थॉमस पेनच्या विचारांची ओळख झाली.

अशा प्रकारे जेव्हा जेव्हा इतिहासात विधायक कामे झाली, तेव्हा तेव्हा सर्व जाती-धर्माचे लोक एकजूट झालेले दिसून येतात आणि हाच खरा इतिहास आहे.

आज महात्मा जोतिराव फुले यांना अभिवादन करत असताना मानवतावाद हा धर्मनिरपेक्ष असतो, ही त्यांची धारणा वैश्विक पातळीवर रुजवणे काळाची गरज भासते. जेव्हा जेव्हा इतिहासात विधायक कामे झाली तेव्हा तेव्हा सर्व जाती-धर्माचे लोक एकजूट झालेले दिसून येतात. हाच खरा इतिहास आहे.
डॉ. कविता मुरुमकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT