सोलापूर : पर्यटन विकास आराखड्याच्या 282 कोटींच्या कामाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची थीम बेस्ड टुरिझम (विषयावर आधारित पर्यटन) म्हणून निवड केली आहे. यामध्ये 11 गावांमध्ये गवताळ सफारी, मधाचे गाव, मिलकॅन मिलेट, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक, माळढोक अभयारण्य आदी पर्यटनासारखे नावीन्यपूर्ण प्रकल्पांना नव्याने विकसित केले जाणार आहे.
गावे निश्चित झाल्यानंतर आता प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची तातडीने मोजणी करून हद्द निश्चित करण्याचे टार्गेट प्रशासनाला देण्यात आले. जागेची हद्द निश्चित झाल्यानंतर आराखड्यातील निधीतून या 11 गावांमध्ये पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा (रस्ते, विश्रामगृहे, माहिती केंद्रे) देण्याचे काम सुरू होईल. या थीम टुरिझममुळे ग्रामीण भागातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.
गावाच्या वेगळेपणानुसार पर्यटन
ज्या गावाचे स्वतःचे असे वेगळेपण आहे, भौगोलिक, नैसर्गिक किंवा ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण आहे. याच आधारे ती गावे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केली जाणार आहेत. त्यासाठी गावांचे महत्व जाणून घेतले जात आहे. आता गावांतील आवश्यक तेवढ्या जागांची मोजणी करण्याचे काम हाती घेण्यात आले.
हद्द निश्चितीच्या सूचना
निवडलेल्या 11 गावांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. गावे निश्चित झाली आहेत. तेथे आवश्यक जागेची मोजणी व हद्द निश्चिती केली जाईल. त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल.
लोंढेवाडी (माढा) ः वेगळेपणानुसार पर्यटन
कात्रज (करमाळा) : वेगळेपणानुसार पर्यटन
कोरेगाव (बाशी) : वेगळेपणानुसार पर्यटन
लांबोटी (मोहोळ) : वन पर्यटन
नान्नज (ता. उ. सोलापूर ) : माळढोक अभयारण्य
बोरामणी (ता. उत्तर सोलापूर) ः गवताळ सफारीचा समावेश
भालेवाडी (सांगोला) : मिल कॅन मिलेट (दूध आणि भरडधान्य)
कोळे (सांगोला) : मधाचे गाव (हनी व्हिलेज)
निमगाव नगर (माळशिरस) : येथे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटन केंद्र होणार