Competitive Exams Pudhari
सोलापूर

Competitive Exams: स्पर्धा परीक्षार्थींना शासनाचा मोठा दिलासा

तीस वर्षांची अट रद्द : बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, अमृत, आर्टीच्या प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा शिथिल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, अमृत आणि आर्टी आदी संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी लागू असलेली ३० वर्षांची कमाल वयोमर्यादा शासनाने शिथिल केली आहे. एमपीएससी, यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

वंचित, मागास, आदिवासी, ग्रामीण तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने या संस्थांमार्फत पूर्व प्रशिक्षण दिले जाते. मात्र, या प्रशिक्षणासाठी सरसकट ३० वर्षांची कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आल्याने अनेक पात्र विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येत नव्हता.

एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षांसाठी अनेक प्रवर्गांमध्ये ३० वर्षांनंतरही परीक्षा देण्याची संधी असताना पूर्व प्रशिक्षणासाठी मात्र ३० वर्षांची अट का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला होता. ही विसंगती दूर करून प्रशिक्षणाची वयोमर्यादा संबंधित स्पर्धा परीक्षांच्या पात्रता निकषांशी सुसंगत करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनने शासनाकडे केली होती. त्‍याची दखल घेत शासनाने ३० वर्षाची अट रद्द केली.

पाठपुराव्याला अखेर यश

स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर शासनाने सामायिक चाळणी परीक्षा २०२६ साठी निर्धारित केलेली कमाल ३० वर्षांची वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित संस्थांच्या लक्षित गटातील पात्र व इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हजारो विद्यार्थ्यांना होणार फायदा

प्रशिक्षणासाठी ३० वर्षांची अट रद्द करून एमपीएससी, यूपीएससीच्या अधिकृत वयोमर्यादेशी सुसंगत धोरण असावे. राखीव प्रवर्गांना शासनमान्य वयोमर्यादा सवलतीचा लाभ प्रशिक्षणासाठी मिळावा, अशी मागणी केली होती. ती मागणी शासनाने पूर्ण केल्‍याने हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्‍याचे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे राज्‍य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT