Universities Pudhari
सोलापूर

Private Universities : खासगी विद्यापीठे अडीचपटीने वाढली

महाविद्यालयांमध्येही खासगी संस्थांचे वर्चस्व : ३९ विद्यापीठे खासगी

पुढारी वृत्तसेवा
गौसपाक पटेल

सोलापूर : महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रात खासगी संस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. २०१९-२० मध्ये राज्यात ११ खासगी विद्यापीठे होती. २०२३-२४ मध्ये यात वाढ होऊन ती संख्या २८ वर पोहोचली आहे. पाच वर्षांत राज्यात १७ नवीन खासगी विद्यापीठांची भर पडली आहे. अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाच्या (एआयएसएचई) अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

राज्यात २०१९-२० मध्ये ११ खासगी विद्यापीठे होती. २०२०-२१ मध्ये ही संख्या १८, २०२१-२२ मध्ये २१ आणि २०२२-२३ मध्ये २१ होती. त्यानंतर २०२३-२४ मध्ये खासगी विद्यापीठांची संख्या २८ वर पोहोचली. या २८ विद्यापीठांमध्ये १ लाख ४ हजार ९०८ विद्यार्थी शिक्षण घेत होते. यामध्ये ६२ हजार ८४६ मुले आणि ४२ हजार ६२ मुली आहेत.

महाविद्यालयांमध्येही खासगी संस्थांचे वर्चस्व

महाविद्यालयांच्या बाबतीतही खासगी संस्थांची संख्या मोठी आहे. एआयएसएचईच्या आकडेवारीनुसार, राज्यातील ५ हजार ३०१ महाविद्यालयांपैकी ३ हजार ७२२ महाविद्यालये खासगी विनाअनुदानित आहेत. याशिवाय १ हजार २६२ महाविद्यालये खासगी अनुदानित, तर ३१७ महाविद्यालये सरकारी आहेत. विद्यापीठे आणि महाविद्यालयांची ही आकडेवारी पाहता, महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या विस्तारात खासगी संस्थांचा वाटा मोठा असल्याचे स्पष्ट होते.

राज्यातील ४५ टक्के विद्यापीठे खासगी

महाराष्ट्रातील एकूण विद्यापीठांची संख्या २०१९-२० मध्ये ६५ होती. २०२३-२४ मध्ये ती वाढून ८७ झाली. यामध्ये २८ खासगी आणि ११ खासगी अभिमत विद्यापीठांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ८७ विद्यापीठांपैकी ३९ विद्यापीठे खासगी आहेत. एकूण विद्यापीठांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे ४५ टक्के आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT