सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिकांसाठी निवडणूक सुरु आहे. त्याच्या प्रचारासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नेत्यांसह उमेदवारांची धावपळ वाढली आहे. आज रविवार (दि. 30) हा प्रचारासाठी सुपर संडे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 30 नोव्हेंबर रोजी भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी अक्कलकोटच्या दौऱ्यावर येत आहेत. उर्वरित जिल्ह्यात उमेदवारांसह आमदारांची प्रचारासाठी धावपळ सुरू आहे. दरम्यान, मोहोळ तालुक्यातील अनगर ही ऐकमेव नगरपंचायत अविरोध झाली असून त्याची अधिकृत घोषणा बाकी आहे.
यंदा सोलापूर जिल्ह्यात महायुतीतील भाजपा आणि शिंदे शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. अक्कलकोट, मैंदर्गी, सांगोला येथे भाजपाविरुध्द शिंदे शिवसेना एकमेकांना तगडे आव्हान दिले आहे.
मतदान दोन डिसेंबर रोजी होत आहे. प्रचाराची सांगता आज 30 नोव्हेंबर रोजी होणार होती, परंतू निवडणूक आयोगाने जाहीर प्रचाराची मुदत महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार एक डिसेंबर रोजी रात्री 10 पर्यंत वाढविली आहे.
मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे एक डिसेंबर रोजी रात्री 10 वाजल्यानंतर प्रचार पूर्णपणे बंद होणार आहे. त्यानंतर प्रचार सभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला, मोहोळ, अक्कलकोट येथे जाहीर सभा घेऊन भाजपाला चांगले आव्हान दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मोहोळ, कुर्डूवाडी येथे सभा घेऊन वातावरण चांगलेच तापविले. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचीही अक्कलकोट येथे जाहीर सभा झाली. आता शेवटच्या टप्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोट येथे सभा होत आहे.