सोलापुर: सोलापुरात महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धेचा महासंग्राम शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या 400 हून अधिक महिला खेळाडूंचे पहाटेपासूनच शहरात आगमन झाले. सकाळच्या सत्रात कुस्तीगीरांच्या वजनांची प्रक्रिया पार पडली, ज्यामुळे मैदानात प्रचंड धावपळ आणि चैतन्याचे वातावरण दिसून आले.
सकाळी 9 वाजल्यापासून वजनांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पारदर्शकता राखण्यासाठी या स्पर्धेत आधुनिक इलेक्ट्रिक काट्याचा वापर करण्यात आला. पंच कमिटीतील 4 ते 5 तज्ज्ञ सदस्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक खेळाडूचे वजन अचूकपणे नोंदवण्यात आले. आपल्या निर्धारित वजन गटात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंची लगबग पाहायला मिळाली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी उद्घाटन झाले.
तनुजाचे ऑलंपिकचे स्वप्न
तनुजा अनिल माळी हिने 14 वर्षाखालील शालेय कुस्ती स्पर्धेत देशात गोल्ड मेडल पटकावले. तनुजा ही सांगलीतील ज्ञानदा हायस्कूल येथे आठवी इयत्तेत शिकते. तिचे वडील शेती करतात. लहानपणापासून तिने कुस्ती शिकण्यास सुरुवात केली. अनेक कुस्ती स्पर्धेत पारितोषके पटकावली. 2025 च्या शालेय कुस्ती स्पर्धेत तिने देशात गोल्ड मेडल पटकावले. यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात तिचे कौतुक झाले. भारताकडून ऑलंपिक खेळण्याचे तिचे स्वप्न आहे.
पारदर्शकतेसाठी आधार कार्ड अनिवार्य
स्पर्धेतील वयोगट आणि वजनाबाबत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक महिला कुस्तीगीराची ओळख पटवूनच प्रवेश दिला गेला. खेळाडूंचे आधार कार्ड आणि फोटो संकलित करूनच त्यांची नोंदणी केली गेली. अधिकृत ओळख पटल्यानंतरच त्यांना मॅटवर उतरण्याची परवानगी दिली गेली.
वजन गटाची शाईने नोंद
प्रत्येक महिला कुस्तीगीराची अचूक ओळख आणि वर्गवारी पटण्यासाठी त्यांच्या हातावर वजनी गटाची नोंद शाईने करण्यात येत होती. यामुळे प्रत्यक्ष कुस्ती लावताना पंचांना आणि संयोजकांना पारदर्शकपणे तातडीने निर्णय घेणे सोपे गेले.