Maharashtra mahila kesari Pudhari
सोलापूर

Maharashtra mahila kesari: पोलिस सख्ख्या बहिणी गाजविणार आखाडा

चार महिला पोलिस कुस्ती खेळणार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरात होत असलेल्या महाराष्ट्र महिला कुस्ती स्पर्धेत चार महिला पोलिसांनी भाग घेतला आहे. या चारही तरुणी अविवाहित असून त्यातील दोघी सख्ख्या बहिणी आहेत. पोलिस दलातील अनेक पदे मिळवून त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत.

ज्ञानेश्वरी भानुदास थिटे, दीपाली भानुदास थिटे, दिव्या प्रभाकर कुंभार आणि अक्षता वाळुंज या चार महिला पोलिस राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. यातील थिटे भगिनी पुणे शहर पोलिसात कार्यरत आहेत. दीपाली कुंभार ही पुणे रेल्वे पोलिस तर अक्षता वाळुंज ही पिंपरी पोलिस दलात कार्यरत आहे. यातील ज्ञानेश्वरी आणि दीपाली या थिटे बहिणींनी त्यांचा संपूर्ण प्रवास सांगितला. पुण्यातील आळंदी येथे त्या राहतात. वडील भानुदास हे शेतकरी परंतु त्यांना कुस्तीची आवड, ते स्वतः कुस्ती खेळत.

पोलिस दलात भरती होण्याचे भानुदास यांचे स्वप्न होते, परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. त्यानंतर त्यांनी दोन्ही मुली आणि मुलाला कुस्तीत पारंगत केले. त्याच जोरावर त्यांची तीनही मुले पोलिस दलात भरती झाली. ज्ञानेश्वरी ही 2017 तर दीपाली ही 2023 रोजी पोलिस दलात भरती झाली. त्यांचा भाऊ सिध्दांत थिटे हा देखील रत्नागिरी येथे पोलिस दलात कार्यरत आहे. ज्ञानेश्वरी आणि दीपाली यांनी पोलिस गेममध्ये कुस्तीत अनेक पारितोषके पटकावली आहेत. दीपाली ही तर कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. क्रीडा क्षेत्रात आलेल्या मुलींनी केवळ खेळावर लक्ष न देता आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत ज्ञानेश्वरी हिने व्यक्त केले. या स्पर्धेत ज्ञानेश्वरीने 59 किलो वजनी गटात तर दीपालीने 50 किलो वजनी गटात भाग घेतला आहे.

पोलिस दलातील नॅशनल मेडल मिळवणार : दिव्या

दिव्या कुंभार ही पुणे रेल्वे पोलिस आहे. मूळची साताऱ्याची असलेली दिव्या ही उत्कृष्ट कुस्तीपटू आहे. तिचे वडील शेती करतात तर आजोबा हे प्रतिष्ठीत कुस्तीपटू होते. लहानपणापासून दिव्या हिने कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तिने ऑल इंडिया कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य पोलिस गेम स्पर्धेत कुस्तीमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी करीत मेडल पटकावले. 2020 मध्ये ती पुणे रेल्वे पोलिस दलात भरती झाली. ती या स्पर्धेत 65 किलो वजनी गटात खेळत आहे. ऑल इंडिया पोलिस गेम स्पर्धेत मेडल पटकावण्याचे तिचे स्वप्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT