सोलापूर : देशात एचआयव्ही व एड्स नियंत्रणासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाही महाराष्ट्रासमोरील आव्हान कायम असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात अंदाजे ३ लाख ९९ हजार २३ एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्ती आहेत. राज्यातील एचआयव्हीचा प्रादुर्भाव ०.२९ टक्के इतका आहे.
देशात सुमारे २५.६१ लाख लोक एचआयव्हीसह जगत असल्याचा अंदाज आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील संख्या सुमारे ३.९९ लाख आहे. त्यामुळे देशातील एचआयव्ही संसर्गाच्या एकूण भारात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २०२५ या एका वर्षात १६ हजार ८०० नवीन एचआयव्ही रुग्ण आढळले आहेत तर २०२६ मध्ये आतापर्यंत अंदाजे पाच हजार नवीन एचआयव्ही संक्रमणांची नोंद झाली आहे.
राज्यात दरवर्षी एचआयव्ही संसर्गामुळे सुमारे सात हजार ९०० रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे आकडेवारी सांगते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत एचआयव्ही नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती, तपासणी आणि उपचार व्यवस्था उभारण्यात आली असतानाही नवीन संक्रमणांचे आव्हान पूर्णपणे संपलेले नाही. महाराष्ट्रात एचआयव्हीचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा कार्यरत असली तरी सुमारे चार लाख व्यक्ती एचआयव्हीसह जगत असल्याची आकडेवारी आणि दरवर्षी होणारी नवीन संक्रमणांची संख्या ही चिंतेची बाब आहे.
तरुणांमध्ये जनजागृतीची गरज
एचआयव्हीविषयी अचूक माहिती, सुरक्षित लैंगिक व्यवहार, वेळेवर तपासणी आणि उपचार याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. विशेषतः तरुणांमध्ये एचआयव्हीविषयी गैरसमज दूर करणे आणि संसर्ग झाल्यास भीती किंवा सामाजिक कलंक न बाळगता उपचार घेण्यासाठी प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेनेही तरुणांना एचआयव्हीच्या दृष्टीने महत्त्वाचा जोखमीचा गट मानले आहे.
एचआयव्ही संसर्ग टाळण्यासाठीचे उपाय
कंडोमचा वापर : प्रत्येक वेळी शारीरिक संबंध ठेवताना नवीन आणि योग्य कंडोमचा वापर करणे अत्यंत प्रभावी ठरते.
नियमित एचआयव्ही चाचणी : स्वतःची, आपल्या जोडीदाराची एचआयव्ही व इतर लैंगिक संक्रमित आजारांची नियमित चाचणी करून घेणे गरजेचे आहे.
पीआरईपी औषधांचा वापर : संसर्ग होण्याचा उच्च धोका असलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्याने प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस हे प्रतिबंधात्मक औषध घेणे सुरू ठेवावे.
सुया सामायिक न करणे : इंजेक्शनद्वारे औषधे किंवा नशेंचे सेवन करताना कधीही दुसऱ्याची वापरलेली सुई किंवा सिरिंज वापरू नये. नेहमी नवीन आणि निर्जंतुक केलेल्या सुयांचाच वापर करावा.
टॅटू आणि पियर्सिंग काळजी : शरीर टोचताना (टॅटू) किंवा कान-नाक टोचताना वापरण्यात येणारे साहित्य पूर्णपणे निर्जंतुक असल्याची खात्री करावी.
गर्भारपणात विशेष काळजी : गर्भवती महिलांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यास वेळेवर वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेतल्यास अर्भकाला संसर्ग होण्याचा धोका टळतो.