Healthcare expenses pudhari photo
सोलापूर

Maharashtra Healthcare Expenses : महाराष्‍ट्रात आजारपणही महागले; एका रुग्‍णाला दरवर्षी सरासरी मोजावे लागताहेत ३,५२२ रुपये

देशात तिसरे स्‍थान; सरकारचा खर्चात आखडता हात

पुढारी वृत्तसेवा
गौसपाक पटेल

सोलापूर : महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचे घरखर्चाचे गणित बिघडले असताना आता आजारपणही महाग झाले आहे. महाराष्ट्रात आजारी व्‍यक्‍तीला उपचारांसाठी वर्षभरात सरासरी तीन हजार ५२२ रुपये खिशातून खर्च करावे लागत आहेत. उर्वरित देशभरात हाच खर्च सरासरी दोन हजार ९०१ रुपये आहे. म्हणजेच देशाच्‍या सरासरीच्‍या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांना ६२१ रुपये अधिक खर्च करावे लागतात. रुग्‍णांच्‍या आजारावरील खर्चाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र केरळम व हिमाचल प्रदेशनंतर तिसर्‍या स्‍थानी आहे, हे विशेष. ‘राष्ट्रीय आरोग्य लेखा अहवाला’तील ताज्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

सरकारी आरोग्य योजनांचा लाभ मिळत असला, तरी डॉक्टरांची फी, तपासण्या व औषधांचा खर्च अनेकदा रुग्णांनाच करावा लागतो. त्यामुळे सरकारी योजना असूनही आजारपणाचा खर्च कमी होत नाही. गुजरात, कर्नाटक व तामिळनाडू या राज्यांच्या तुलनेतही महाराष्ट्रातील रुग्‍णांना उपचारांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

योजना असताना उपचारांवर वाढता खर्च

सरकारी आरोग्य योजनांचा लाभ प्रामुख्याने रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या उपचारांसाठी मिळतो. मात्र आजाराची प्राथमिक तपासणी, डॉक्टरांची फी, रक्ताच्या चाचण्या, एक्स रे आणि औषधांचा खर्च रुग्णांनाच करावा लागतो. नियमित तपासण्या व औषधांसाठी सरकारी योजनांचे संरक्षण मर्यादित असल्याने रुग्णांचा खिसा रिकामा होतो. त्यात खासगी रुग्णालये व औषधांवरील खर्चाची भर पडते. त्यामुळे आरोग्य विमा किंवा सरकारी योजनेचा लाभ असूनही सामान्यांना उपचारांसाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागत आहेत.

सरकारी खर्च कमी, नागरिकांवर भार अधिक

महाराष्ट्रात आरोग्यावर वर्षाला केवळ २९.३ टक्के खर्च सरकार करते. देशात हे प्रमाण ४३.५ टक्के आहे. सरकार आरोग्यावर ३३, ७५१ कोटी रुपये खर्च करते, तर नागरिकांना स्वतःच्या खिशातून ४४, ७३४ कोटी खर्च करावे लागतात. म्हणजेच सरकारपेक्षा नागरिकांचाच खर्च १०,९८३ कोटी रुपयांनी (३८.८ टक्‍के) जास्त आहे.

आरोग्‍यावरील राज्यनिहाय खर्च

केरळम : ८,८७० हिमाचल प्रदेश : ४,२५४

महाराष्ट्र : ३,५२२ उत्तर प्रदेश : ३,४१३

तामिळनाडू : २,५७७ राजस्थान : २,२८१

कर्नाटक : २,२०८ गुजरात : २,१७६

आसाम : १,३३२

प्रौढांच्या तुलनेत बालरुग्णांच्या उपचारांचा खर्च कमी असतो. प्रौढांच्या विविध आजारांच्या निदानासाठी अनेक प्रकारच्या तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्यांचे दर अधिक असल्याने त्याचा आर्थिक भार थेट रुग्णांच्या पालकांवर पडतो. त्यामुळे वेगवेगळ्या तपासण्या एकत्रित करून त्या पॅकेजचे दर कमी केल्यास रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.
- डॉ. समीर खान, एम.डी., बालरोगतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT