सोलापूर ः महापालिका निवडणुकीत मुहूर्त पाहून अर्ज घेणे आणि दाखल करण्यासाठी अनेकांनी आपापल्या ज्योतिष्य आणि पंडितांकडे रांगा लावल्या आहेत. सर्वसाधारण विचार करता 25, 26, 28 आणि 29 हे चार दिवस अर्ज दाखल करण्यासाठी चांगले आहेत तर 27 आणि 30 रोजी अशुभ तिथी आहे. सुट्टीचे दिवस वगळता केवळ 26 व 29 हे दोनच दिवस अर्ज भरण्यासाठी चांगले आहेत.
हिंदू संस्कृतीत कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी जसे मुहुर्त पाहिले जातात, तसेच निवडणुकीच्या राजकारणातही मुहूर्ताचे महत्त्व अजूनही टिकून आहे. महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी अनेकांनी राशीनुसार मुहूर्त पाहणे सुरू केले आहे. परंतु सर्वसाधारण सर्वांसाठी चांगला दिवस कोणता याबाबत पंचागकर्ते मोहन दाते यांनी माहिती दिली.निवडणुकीच्या काळात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रशासकीय दिवस महत्वाचे असतातच. पण उमेदवारांच्या सोयीने मुहूर्तही पाहिले जातात. मुहूर्तासाठी चांगला दिवस पाहून उमेदवारी अर्ज भरला, याचे मानसिक स्वास्थ्यही महत्त्वाचे ठरते.
सुट्टीचे दिवस वगळता केवळ 26 आणि 29 हे दोनच दिवस अर्ज दाखल करण्यारसाठी शुभ आहेत. 27 डिसेंबर व शेवटचा 30 डिसेंबर हे दिवस पंचागांच्या द़ृष्टीने अशुभ आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज भरणार्यांची संख्या अधिक असते परंतु यंदा ती अशुभ तिथी असल्याने किती अर्ज दाखल होतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जन्म तिथी, रास आणि ग्रहमान...
अर्ज घेणे व दाखल करण्यासाठी अनेकांनी जन्मपत्रिका घेऊन ज्योतिषांकडे रांगा लावल्या आहेत. जन्म तिथी, रास आणि ग्रहमान पाहून अर्ज दाखल करण्याकडे ओढा जास्त आहे. त्यासाठी ज्योतिषांना भरमसाठी पैसे मोजण्याची उमेदवारांची तयारी आहे. याचा परिणाम म्हणजे ज्या दिवशी शुभ मुहूर्त असेल त्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी असणार आहे. निवडून येण्यासाठी उमेदवार जसे साम दाम दंड भेद या चारही प्रकारचा वापर करतात तसेच ज्योतिषांचा सल्लाही प्राधान्याने घेण्यात येत असल्याचे दिसते.
महापालिका निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी 26 व 29 हे दोन दिवस चांगले आहेत. त्यावेळी कोणीही अर्ज दाखल करु शकता. 27 आणि 30 या अशुभ तिथी आहेत. उमेदवारांच्या राशीनुसार पत्रिका पाहून कोणत्या दिवशी व वेळी अर्ज दाखल करावा हे सांगावे लागेल.मोहन दाते, पंचागकर्ते