सोलापूर : पीएच.डी., नेट, सेट असूनही राज्यातील हजारो प्राध्यापक शासकीय नोकरीपासून वंचित आहेत. त्यामुळे राज्यातील रिक्त असलेल्या बारा हजारांपेक्षा जास्त जागा भराव्यात, अशी मागणी प्राध्यापकांतून होत आहे. मात्र, शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
सध्या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती होत असताना संपूर्ण राज्यात मात्र प्राध्यापकांच्या बारा हजारांपेक्षा जास्तीच्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनेक प्राध्यापक हे पीएच.डी. तसेच नेट, सेट असूनही त्यांना पदापासून वंचित राहावे लागत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयात जवळपास 800 प्राध्यापक हे कंत्राटी तसेच तासिका तत्त्वावर काम करत आहेत. तर राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे तसेच अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल 12 हजार 527 पेक्षा जास्त प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. त्यापैकी चार हजार 300 प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाने अर्थ विभागाकडे सादर केला आहे. राज्यातील सर्व विद्यापीठामध्ये तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त असताना याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता.
मात्र याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) राज्यात लागू झाले आहे. ज्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांसह शिक्षकेतर कमचार्यांची रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे. राज्यातील सार्वजनिक 11 विद्यापीठे आणि 1 हजार 172 अनुदानित महाविद्यालयांमध्ये 33 हजार 763 प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. त्यातील 21 हजार 236 पदांवर प्राध्यापक कार्यरत असून, तब्बल 12 हजार 527 जागा रिक्त आहेत. एकूण मंजूर पदांच्या 37.11 पदे रिक्त आहेत.
राज्यात अनेक वर्षापासून प्राध्यापकांच्या भरती रखडली आहे. प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचार्यांची पदे लवकरात लवकर भरावीत, अशी मागणी विविध संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी विविध संघटनेने उपोषण, मोर्चे ही काढले आहेत. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभाग वित्त विभागाच्या मंजुरीनंतर आता राज्यात 80 टक्केपदभरती होण्याची शक्यता आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ तसेच संलग्न महाविद्यालयात जवळपास 800 प्राध्यापक कंत्राटी पदावर काम करत आहेत. यातील प्राध्यापक सेट, नेट तसेच पीएच.डी.धारक असूनही त्यांना तासिका तत्त्वावर काम करावे लागत आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांमध्ये प्राध्यापकांची भरती रखडल्यामुळे या प्राध्यापकांना कंत्राटी पद्धतीने काम करावे लागत आहे.
गेल्या काही वर्षांपासून पदभरती होत नसल्याने नेट, सेट, पीएच.डी. पात्रताधारक प्राध्यापक कंत्राटी पद्धतीने कामे करत आहे. यूजीसीच्या नियमानुसार सर्व विद्यापीठ, महाविद्यालयात प्राध्यापकांची मंजूर पदांची भरती प्रक्रिया लवकर पार पडल्यास कंत्राटी पद्धतीने कामे करणार्या प्राध्यापकांना हक्काची नोकरी मिळणार आहे. त्यामुळे वित्त विभागाने पदभरतीस तत्काळ मंजुरी देऊन प्राध्यापकांची पदे भरावीत, अशी मागणी पवित्र शिक्षक भरती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर हे करत आहेत.
-अनुदानित महाविद्यालय मंजूर
पदे -31185
- रिक्त प्राध्यापक पदे संख्या -
11080
- सार्वजनिक विद्यापीठ मंजूर पदे-
2578
- रिक्त प्राध्यापक पदे - 1440