माढा : सीना नदीपात्रातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला करत ग्राम महसूल अधिकाऱ्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना माढा तालुक्यातील उंदरगाव येथे गुरुवारी (ता. 12) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत खैरावचे ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील कोंडगुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तहसीलदार माढा यांच्या आदेशानुसार कोंडगुळे हे सहकारी ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण मोघल, लक्ष्मण शेलार व विकास कांगणे यांच्यासह उंदरगाव परिसरातील सीना नदीपात्रात अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेले होते. नाईकवाडे वस्तीजवळ काहीजण ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असल्याचे दिसताच पथक तेथे पोहोचले. पथक आल्याचे लक्षात येताच संबंधितांनी ट्रॉलीतील वाळू खाली करून ट्रॅक्टरसह पळ काढला.
त्यावेळी कोंडगुळे व विकास कांगणे यांनी दुचाकीवरून ट्रॅक्टरचा सुमारे एक ते दीड किलोमीटर पाठलाग केला. दरम्यान, केवड-मानेगाव रस्त्यावर काहीजणांनी दुचाकी आडवी लावून पथकाची अडवणूक केली. यावेळी संशयित परमेश्वर नागनाथ राऊत व प्रवीण शिवाजी काळे यांनी कोंडगुळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या गळ्याला, डोक्याला व हाताला दुखापत झाली. तसेच सहकारी विकास कांगणे यांनाही ढकलून देण्यात आले.
घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करत असताना संशयित आरोपींनी मोबाईल हिसकावून फेकून दिला व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी परमेश्वर नागनाथ राऊत, संजय सुरेश भोगे, बाळासाहेब ऊर्फ सोमेश्वर नागनाथ राऊत व प्रवीण शिवाजी काळे (सर्व रा. मानेगाव, ता. माढा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हेड कॉन्स्टेबल घुगे तपास करत आहेत. वाळूमाफीयांवर पायबंद घालण्याच्या दृष्टीने कडक कारवाई होण्याची अपेक्षा आहे.