बार्शी : अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस बार्शी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी वीस वर्षे सक्तमजुरी व 24 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. गणेश मारुती पवार असे त्याचे नाव आहे. माढा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या गणेश याने 28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता.
याबाबत माहिती अशी, निर्भया ही टीव्ही पाहण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती. घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार घरी कोणास सांगीतला तर जीवे मारण्याची धमकीही दिली. घाबरलेली निर्भया घरी गेल्यावर आई वडिलांनी विचारणा केली. त्यावेळी तिने आईला तिच्या सोबत घडलेल प्रकार सांगितला. आईच्या तक्रारीवरुन माढा पोलीसात बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल झाला. तात्कालीन सहा. पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर व पो.हे. कॉ संदिप निचळ यांनी आरोपीस अटक केली. सबळ पुरावा गोळा करून आरोपीविरूध्द बार्शी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकार पक्षाने 7 साक्षीदार तपासले. फिर्यादी आई, पिडिता मुलगी व फिर्यादीच्या साक्षीस अनुसरुन वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष, सपोनि बंडगर यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे, अत्याचाराच्या अनुषंगाने आलेला पुरावा या सर्व बाबी सरकारी वकिल दिनेश देशमुख यांनी कोर्टासमोर मांडल्या. सरकारी पक्षाचा युक्तीवाद व आरोपीविरुध्द आलेला पुरावा याचा विचार करता आरोपी गणेश पवार यास एकूण वीस वर्षांची सक्तमजुरी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षा तर्फे सरकारी वकिल दिनेश देशमुख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर व महिला पोलीस अमलदार रीना शेख यांनी साक्षीदारांना योग्य मार्गदर्शन करून वेळोवेळी कोर्टात हजर ठेवले.
दंडाची पूर्ण रक्कम निर्भयाला देण्याचा आदेश
विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश मांडे यांनी आरोपीस भादविक 377 अन्वये दोषी धरुन 10 वर्षे सक्त मजुरी व 5,000 रू दंड व दंड न भरल्यास 2 महिने सक्त मजूरी, बाल लैंगिक अत्याचार कायदा 2012 कलम 4 अन्वये 10 वर्षे सक्त मजुरी व 5000 रु दंड व दंड न भरल्यास 2 महिने सक्त मजूरी, बाल लैंगिक अत्याचार कायदा 2012 कलम 6 अन्वये 20 वर्षे सक्त मजुरी व 10,000 रु दंड व दंड न भरल्यास 4 महिने सक्त मजूरी, बाल लैंगिक अत्याचार कायदा 2012 कलम 8 अन्वये 3 वर्षे सक्त मजुरी व 2000 रु दंड व दंड न भरल्यास 1 महिने सक्त मजुरी, बाल लैंगिक अत्याचार कायदा 2012 कलम 12 अन्वये 3 वर्षे सक्त मजुरी व 2000/- रु दंड व दंड न भरल्यास 1 महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली. दंडाची पूर्ण 24000 रू रक्कम निर्भया हीस नुकसान भरपाई पोटी देणेबाबत न्यायालयाने आदेश केले.