सोलापूर : घरगुती गॅस सिलिंडरची नोंदणी केल्यानंतर 96 तासांत म्हणजे अवघ्या चार दिवसांत घरपोच गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जाईल, तसे आदेश संबंधित गॅस पुरवठादारांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्ह्यातील गॅस सिलिंडर वितरणासंदर्भात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बैठक घेतली. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, एलपीजी गॅस पुरवठा करणारे जिल्हा समन्वयक अधिकारी भुकय्या रघुकुमार यांच्या सह सोलापूर शहर व जिल्ह्यातील गॅस एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ऑनलाईन बुकिंगनंतर घरपोच गॅस सिलिंडर मिळेल. एजन्सीमध्ये गॅस मिळणार नसल्याबाबतचे फलक गॅस एजन्सी दुकान व गोदामसमोर लावून त्याबाबतचे एसएमएस ग्राहकांना मोबाईलवर पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
जिल्ह्यात एलपीजीचा पुरवठा मागणीप्रमाणे होत आहे. संबंधित कंपन्यांनी त्यांचा दैनंदिन अहवाल प्रशासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंपनीस्तरावर गॅस विक्रेत्यांसाठी ज्या सूचना असतील त्या लेखी स्वरूपात गॅस विक्रेत्यांना द्याव्यात. दुसरे गॅस सिलिंडर वाटप शहरी भागात 25 दिवस तर ग्रामीण भागात 45 दिवसांनी होत आहे. त्या नियमावलीचे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
एलपीजी गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्याचे जिल्हा समन्वयक अधिकारी रघुकुमार यांनी सिलिंडर पुरवठ्याच्या अनुषंगाने एचपीसीएल, बीपीसीएल व आयओसीएल यांच्याकडून एजन्सीसाठी सूचना दिलेल्या आहेत. तक्रारी 9769919221 या व्हॉटस्ॲप क्रमांकावर करता येतील, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.