नातेपुते : शरद पवार हे ८ डिसेंबरला मारकडवाडी गावाला भेट देणार आहेत. त्यावेळी गावात लाँग मार्च होणार आहे. ईव्हीएम विरोधातील वनवा याच गावातून सुरू झाला असुन राहुल गांधी यांच्या सह उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आदींना या ठिकाणी आमंत्रित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएमच्या विरोधात पेटवलेला वनव्याची ठिणगी संपुर्ण देशात पोहोचली आहे. स्वखर्चाने बॅलेट पेपरवर फेर मतदान चाचणी करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. ३ डिसेंबरला पेपर ही छापण्यात आले होते. त्यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मारकडवाडी गावाने एका प्रकारे निवडणूक आयोगाला आव्हान दिले होते. परंतु प्रशासनाच्या दबावामुळे गावकऱ्यांना बॅलेट पेपरवर निवडणुक घेता आली नाही.
असे असले तरीही मतदान घेण्याची तयारी ग्रामस्थांनी केल्यामुळे ८८ जणांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. तरीही ग्रामस्थ बॅलेट पेपर वर मतदान घेण्यासाठी फेरमतदान चाचणी करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे शरद पवार या ग्रामस्थांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून पुढील धोरण ठरवणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारी ग्रामस्थांनी केली असून गावालगत गायरानावर हेलिपॅड उभारण्याचे काम करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत समोर व्यासपीठ उभारण्यात आलेले आहे. माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच विद्यमान आमदार उत्तमराव जानकर जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.