Pudhari File Photo
सोलापूर

लांब पल्ल्याच्या नियोजनाने स्थानिक बसचा खोळंबा

सोलापूर विभागाकडून उन्हाळी 62 बसमधून जादा वाहतूक; 15 एप्रिलपासून धावणार बसेस

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : एस.टी. महामंडळाकडून दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जादा बस वाहतुकीचे नियोजन केले जाते. यावर्षीही 15 एप्रिलपासून राज्यातील विविध भागांत बस धावणार आहेत. एकीकडे बसची अपुरी संख्या असताना दुसरीकडे मात्र लांब पल्ल्याच्या बसेस पाठविण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे स्थानिक बस फेर्‍यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. सोलापूर विभागाकडून यंदा 62 बसेसमधून वाहतुकीचे नियोजन आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून समाजातील विविध घटकांसाठी प्रवासात सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यातच महिला प्रवाशांच्या संख्येत भर पडत आहे. दुसरीकडे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, याकरिता जादा बस वाहतुकीचे नियोजन केले जात आहे. मात्र, हे नियोजन करीत असताना इतर बसफेर्‍यांवर परिणाम होणार नाही, याचाही विचार करणे आवश्यक झाले आहे. सोलापूर विभागात सोलापूरसह आठ आगारांचा समावेश होतो. या सर्व आगारांतून 650 पेक्षा अधिक बस राज्यातील कानाकोपर्‍यात धावतात. मात्र, यातील अनेक बस नादुरुस्त होत असल्याने अनेकदा बस फेर्‍यावर परिणाम होतो. दिवसभरात पाच ते 10 बस दुरुस्तीच्या कारणाने आगारात दाखल होतात. त्यातच उन्हाळ्यात बस नादुरुस्तीचे प्रमाणही अधिक होते. परिणामी, बस फेर्‍या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना ताटकळत इतर बसची वाट पाहावी लागते.

मागील अनेक वर्षांपासून परभणी एसटी महामंडळाच्या ताफ्यात अपेक्षित बस दाखल झाल्या नाहीत. त्याच बसवर जिल्ह्यातील एसटीचा डोलारा सुरू आहे. यंदा महामंडळाकडून 15 एप्रिल ते 15 जूनपर्यंत जादा बसचे नियोजन केले आहे. या बस पुणे, कोल्हापूर, धाराशिव, स्वारगेट यासह अन्य मार्गावर धावणार आहेत. या सर्व बस लांब पल्ल्याच्या राहणार आहेत. दुसरीकडे मात्र स्थानिक गावांना वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याची ओरड होताना दिसत आहे. अनेक भागात बस फेर्‍यांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात बसची मागणी असूनही पुरवठा होत नसल्याने अनेक गावांना आजही बसची प्रतीक्षा आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीबरोबरच स्थानिक प्रवाशांचा खोळंबा होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT