सोलापूर : एसटी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसही मेंटनन्स न करताच पुढच्या मार्गावर पाठवल्या जात आहेत. टायर पंक्चर होणे, इंजिन तापणे, ऑइल गळती होणे, वायफर काम न करणे या समस्या तर नित्याच्याच झाल्या आहेत. देखभाल दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने रात्री-अपरात्री बसेस बंद पडण्याचे प्रकारही वाढले आहेत.
सोलापूर आगारातील दैनंदिन बसेसचे नियोजन, प्रवासात येणार्या अडचणी, महामंडळाची बसेस दुरुस्तीची प्रक्रिया जाणून घेतली असता हे धक्कादायक वास्तव समोर आले. यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत. सुरक्षित प्रवास म्हणून एसटी प्रवासाला प्राधान्य दिले जाते. त्यात महिलांना अर्धेतिकीटासह अन्य विविध वर्गातील सवलतींमुळे एसटीची प्रवासी संख्या दुपटीने वाढली. मात्र, बसेसची नियमित दुरुस्ती, तांत्रिक असुविधा, अपूर्ण साधनसामुग्रीसह अपूर्ण मनुष्यबळामुळे अनेक बसेसची दुरवस्था कायम आहे. याकडे मात्र परिवहन महामंडळ कानाडोळा करीत आहे. सोलापूर विभागात शिवशाही, स्लिपर आणि साध्या एसटी बसेस आहेत. सोलापूर विभागातून दररोज प्रवास करणार्या प्रवाशांनी संख्या मोठी आहे.
सण-उत्सवांमुळे सध्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अशात लांब पल्ल्याच्या गाड्या आगारात आल्यावर त्यांच्यावर नियमानुसार एक तास तरी मेंटनन्सचे काम होणे गरजेचे आहे. परंतु, इतर रूटच्या फेर्या बाकी आहेत म्हणून पाट्या बदलून त्या गाड्या दुरुस्तीला न नेता प्रवासाला पाठवल्या जाताहेत. परिणामी, गाडीत बिघाड होवून दुरुस्त झाल्यावर चालकालाच दोषी धरले जाते. तसेच बसचे पुढील चाक नवीन असणे गरजेचे असताना रिमोल्ड केलेले टायर वापरले जात आहे. त्यामुळे टायर फुटून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या प्रवाशांची गर्दी आहे. त्यात एसटीची संख्या कमी आहे. पुणे किंवा इतर लांबवरून वाहन आले की त्याचे मेंटनन्स गरजेचे आहे. वरवर दुरुस्ती केली जाते. कधी तर इंजिन थंड व्हायच्या आतच गाडी पुढच्या मार्गावर रवाना केली जात असल्याची माहिती एसटीच्या चालकांनी दिली.
नेहमी टायर पंक्चर होणे, इंजिन गरम होणे किंवा ऑईल गळतीसारख्या समस्या आहेत. अनेक गाड्यांना चांगले हेडलाईट नाहीत, दुसर्या वाहनांच्या प्रकाशात जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. दुरूस्तीला वाहन पाठवले की तिथे स्पेअरपार्टचा तुटवडा आहे. दुसर्या बसचे सुटे भाग बसला लावून ती बस चालवली जाते. स्वच्छ बस मिळत नाही.
गतवर्षी परिवहन आयुक्तांनी स्वतंत्र पत्र काढून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करू नका, असे आदेश केले होते. मात्र, या पत्राला एसटी महामंडळाने केराची टोपली दाखवली आहे. एसटीत 44 आसन तर 11 उभ्या प्रवाशांना आरटीओची परवानगी आहे. मात्र, प्रत्यक्षात 60 पेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक बसमधून केली जाते आहे. आरटीओकडून कारवाई झाली तर चालकावरच खापर फोडले जाते. गर्दीत विनातिकीट प्रवास करताना एखादा प्रवासी एसटीच्या पथकाला आढळून आला तर त्यालाही वाहकाला जबाबदार धरले जाते.