सोलापूर : ऑक्टोबर महिन्यात होणार्या बीए, एलएलबी परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. फॉर्म भरण्याची शेवटची दि. 27 सप्टेंबर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचणे शक्य होत नाही, ज्यामुळे त्यांना परीक्षा फॉर्म भरण्यात अडचणी येत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत शहर उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद गुमटे यांच्यासह श्रीकृष्ण सावंत, आदित्य बागल, प्रणव पाटील, संकेत जगदाळे आणि हर्ष पाटील यांनी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात विद्यापीठाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे.
या मागणीला पाठिंबा देत खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांनीदेखील सोलापूर विद्यापीठ कुलगुरूंशी बोलून विद्यार्थ्यांसाठी योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.